नागपूर : सॅटेलाईट टॅग केलेल्या ‘बागेश्री’ या ऑलिव्ह रिडले कासवाने गुहागरपासून एका सरळ रेषेत तब्बल १२०० किलोमीटरचे अंतर कापले आहे. भारतीय वन्यजीव संस्था देहरादूनच्या सहकार्याने महाराष्ट्र वनविभागाच्या मँग्रोव्ह फाउंडेशनने सुरू केलेला हा संयुक्त संशोधन प्रकल्प आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले कासवांची तुरळक घरटी आहेत. आतापर्यंत ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांना फक्त भारताच्या पूर्व किनाऱ्यावर टॅग करण्यात आले.
भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील ऑलिव्ह रिडले कासवांचा हा पहिला सॅटेलाईट टॅगिंग प्रकल्प आहे. कासवांची हालचाल आणि त्यांच्या स्थलांतरणाचे स्वरुप, त्यांची संख्या समजून घेण्यासाठी सुरू केलेला हा संशोधन प्रकल्प आहे. या प्रकल्पाअंतर्गत २१ फेब्रुवारीला भारतीय वन्यजीव संस्था, मँग्रोव्ह फाउंडेशन व महाराष्ट्र वनविभागाच्या रत्नागिरी विभागाच्या पथकांनी गुहागर समुद्रकिनाऱ्यावर गस्त घातली. यावेळी त्यांना दोन मादी ऑलिव्ह रिडले कासव आढळून आले. ही दोन्ही कासवे समुद्रकिनाऱ्यावर घरटी बांधण्यासाठी आली होती.
हेही वाचा >>> VIDEO : ‘जग्गू’ बिबट्याला ‘एन्ट्रोप्रीऑन ऑफ आईज’ आजार, तीन महिन्यानंतर परतली दृष्टी
त्यांनी घरटी केल्यानंतर २३ फेब्रुवारीला भारतीय वन्यजीव संस्थेच्या चमुने त्यांना सॅटेलाईट टॅग केले आणि पुन्हा या कासवांना समुद्रात सोडण्यात आले. या दोन्ही कासवांना ‘बागेश्री’ व ‘गुहा’ अशी नावे देण्यात आली. त्यापैकी ‘बागेश्री’ हे मादी कासव रत्नागिरी ते अरबी समुद्राच्या दक्षिणेकडे गेले आहे आणि कन्याकुमारीच्या दक्षिणेला शंभर किलोमीटर अंतरावर आहे. ‘बागेश्री’ने आतापर्यंत गुहागरपासून एका सरळ रेषेत १२०० किलोमीटरचे अंतर कापले आहे.