यवतमाळ येथील आर्णी रोडवर कृषी नगरजवळ एका भरधाव कारचालकाने पादचाऱ्यांसह दुचाकी स्वार व हात गाडीवाल्यांना उडविले. यात दोन जण गंभीर जखमी झाले असून, पाच ते सहा लोक जखमी झाले. ही घटना मंगळवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली. अक्षय उमरे (२०), दिलीप दारूटकर (४५) दोघेही रा. पुष्पकुंज सोसायटी,यवतमाळ अशी जखमीची नावे आहेत. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील अक्षयची प्रकृती गंभीर आहे. तर दिलीप यांच्या डोक्याला मार लागला असून पाय फ्रॅक्चर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विजय किसन चव्हाण (३०), रा. वाघाडी हा कार ( क्र. एमएच ४२, एएफ १००८) ने आर्णी मार्गाने वडगावकडे जात असताना कृषी नगर गेटजवळ त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी पदपथावर गेली. पद पथावर भाजी विकणाऱ्या हातगाड्यांना , दुचाकींना व वाहनचालकांना चिरडत पुढे गेली. या गाडीने पाच भाजी विक्रेत्यांच्या हातगाड्यांना व तीन ते चार दुचाकीस्वरांना उडवले. ही धडक इतकी भीषण होती की रस्त्यावर भाजीपाला, दुचाकी आणि जखमी माणसं इतरत्र पडले होते. एका खांबाला धडकून ही कार थांबली. नागरिकांनी वाहनचालकाला गाडीबाहेर काढून चोप दिला. वाहनचालक विजय चव्हाण हा मद्य प्राशन करून होता.

हेही वाचा…विदर्भ गारठला… गोंदिया ९.४, तर नागपूर, वर्धा १० अंश सेल्सिअस

नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले. अवधूतवाडी पोलीस, वाहतूक शाखा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. कारच्या चालकास नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर कारची तोडफोड केली. यवतमाळ या पद्धतीचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. यासाठी वाहतूक पोलिसांचे व नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

हेही वाचा…प्रियकर की शिक्षक ! डीएनए ठरला पुरावा आणि न्यायालयाने ठोठावली शिक्षा

रस्त्यावर हातगड्यांचे अधिराज्य, पोलिसांचे दुर्लक्ष

यवतमाळ शहरात सध्या पोलिसांचा कोणताही वचक नाही. शहरात सर्व मुख्य रस्ते हातगाडीवाल्यांनी काबीज केले आहे. मंगळवारी अपघात झालेल्या आर्णी मार्गावर पद पथाच्याही पुढे मुख्य मार्गावर १० फुटपर्यंत भाजी, फळं विक्रेते अतिक्रमण करून रस्ता व्यापून असतात. नगर परिषद या हातगाडीवाल्यांकडून प्रतिदिन शुल्क घेतात. त्यामुळे नगर परिषद शहरातील या अतिक्रमणाकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतो. वाहतूक शाखाही कारवाईची जबाबदारी नगर परिषदेकडे ढकलून नमनिराळी राहते. ही शाखा केवळ पेट्रोलिंग पुरती उरली आहे. वाहतूक पोलिसांचे वाहन सायरन वाजवत आले की, हातगाडीवाले क्षणात परागंदा होतात. पोलिसांचे वाहन पुढे गेले की, पुन्हा अवतरतात आणि रस्त्यावर अतिक्रमण करतात. त्यातून वाहनचालक आणि हातगाडीधारकांमध्ये अनेकदा वादाचे प्रसंगही घडतात. वाहतूक शाखासुद्धा ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कालच्या अपघातानंतर नागरिकांनी केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On arni road in yavatmal near krishi nagar speeding car driver ran over pedestrians two wheeler riders and handcarts nrp 78 sud 02