नागपूर: राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर जनसामान्यामध्ये असलेली नाराजी बघता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने या राजकीय परिस्थितीवर संताप व्यक्त करण्यासाठी नागपुरात व्हेरायटी चौकात एक सही संतापाची आंदोलन करण्यात आले. यात मनसेच्या पदाधिकारी आणि शहरातील नागरिकांनी एका फलकावर स्वाक्षरी करत सरकार विरोधात नाराजी व्यक्त केली.
अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी झाल्यानंतर जनसामान्यामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी समोर येत असताना महाराष्ट्र नवनिर्माण याचा निषेध करण्यासाठी राज्यात एक सही संतापाची आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. नागपुरात मनसेचे शहर अध्यक्ष चंदू लाडे, विशाल बडगे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची मते जााणून घेत त्यांच्या स्वाक्षरी घेतल्या.
हेही वाचा… साडी नेसण्यामागे आहे शास्त्रीय कारण; याचा महिलांना काय फायदा होत असेल?
यावेळी मोठ्या प्रमामात नागरिकांनी स्वाक्षरी करत सरकारच्या विरोधात नाराजी व्यक्त केली. ज्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहे त्यांना सरकारमध्ये सहभागी करुन घेतल्यामुळे अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. शिंदे – फडणवीस सरकारकडून अशी अपेक्षा नसल्याच्या प्रतिक्रिया यावेळी अनेक नागरिकांनी व्यक्त केल्या.