अकोला : निरभ्र रात्री आकाशात अचानक एखादी प्रकाशरेषा क्षणार्धात चमकून जाते. ती उल्का वर्षाव असते. १३ आणि १४ डिसेंबरला देखील अवकाशात उल्का वर्षाव होणार असून खगोलप्रेमींसाठी ही पर्वणी ठरणार आहे. आकाशातील या घटनेचा आनंद घेण्याचे आवाहन विश्वभारती केंद्राचे संचालक प्रभाकर दोड यांनी केले आहे.
सरत्या वर्षात अनेक खगोलीय घटना अनुभवता आल्या आहेत. यात चंद्र ग्रहण, सूर्य ग्रहण यांचा समावेश आहे. त्याच बरोबर या वर्षाच्या शेवटी डिसेंबर महिन्यात उल्का वर्षाव नागरिकांना पाहता येणार आहे. सूर्यकुलाचेच घटक असलेले धुमकेतू, ग्रह, लघुग्रह किंवा उपग्रहांदीचे वस्तू कण भ्रमण कक्षेत विखुरलेल्या स्वरुपात असतात. पृथ्वी या लहान-मोठ्या कणांजवळून फिरते तेव्हा या वस्तू गुरुत्वाकर्षणाने ओढल्या जातात. वातावरणात घर्षणामुळे ते कण पेट घेतात. त्यांच्या उंची व घटकांप्रमाणे लाल, पिवळ्या, पांढऱ्या व निळ्या रंगात चमकताना दिसतात. बहुतांशी उल्का वातावरणातच नष्ट होतात.अपवादात्मक एखादी पूर्णांशाने न जळता पृथ्वीवर येऊन आदळते. त्याला अशनी असे म्हणतात.
हेही वाचा…थरारक… वायुसेनेच्या जवानाची आत्महत्या, कर्तव्यावर तैनात असताना डोक्यात घातली गोळी अन्…
१३ आणि १४ डिसेंबरच्या रात्री फेथेन लघुग्रहाचे वस्तू कण उल्कांच्या रूपात पडताना पाहता येतील. आदर्श स्थितीत दरताशी सरासरी १२० या प्रमाणात पडतील. हे दृश्य पाहण्यासाठी अधिक अंधाराच्या भागातून कमी प्रदूषित जागा अधिक सोयीची ठरणार आहे. हेमंत ॠतूतील गुलाबी थंडीत मिथुन राशीतील उल्का वर्षाव पूर्वेच्या समृद्ध आकाशात रात्री ९ नंतर सुरू होऊन पहाटेपर्यंत वाढत्या संख्येने बघता येईल, असे प्रभाकर दोड यांनी सांगितले.
पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राजवळ उल्कांचे उगमस्थान
पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राजवळ उल्कांचे उगमस्थान असल्याने त्याची तेजस्वीता काहीशी कमी दिसेल. त्याचे दर्शन शांत, निवांत घेणे सोयीचे होईल. दोन्ही दिवशीचे पहाटे अंतराळ संशोधन केंद्र अर्थात फिरत्या चांदणीचा आकाश नजारा १३ डिसेंबरला ६.०९ ते ६.१५ या वेळेत पश्चिम ते उत्तर बाजूस, तर १४ डिसेंबरला पहाटे ५.२४ ते ५.२६ या वेळेत उत्तर आकाशात पाहता येईल, असे दोड म्हणाले.
हेही वाचा…चंद्रपूर जिल्ह्यात सातवाहनकालीन वस्तीचे अवशेष; कधी होते मोठे शहर, आज आहे गर्द वनराई…
तारा कधीही तुटत नाही
अंधाऱ्या रात्री आकाशाचे निरीक्षण करत असताना क्षणार्धात एखादी प्रकाशरेषा चमकून जाताना आपण पाहतो. या घटनेस ‘तारा तुटला’ असे म्हटले जाते; परंतु तारा कधीही तुटत नाही. ही एक खगोलीय घटना आहे व यालाच ‘उल्का वर्षाव’ म्हणतात.