नागपूर : लग्न मोडल्याच्या कारणावरून दोन कुटुंबात वादविवाद झाला. वादानंतर दोन्ही कुटुंबातील युवकांनी तलवारी काढून एकमेकांवर हल्ला केला तसेच दगडफेक केली. या हल्ल्या दोन्ही गटातील १२ जण जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना शनिवारी रात्री दहा वाजता राजीवनगरात घडली. घटनेनंतर राजीवनगरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी दोन्ही गटांवर गुन्हा दाखल केला.

महिलांचाही सहभाग

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजीव नगरात गवते, काळे, पोटे आणि दुलांगे कुटुंब एकमेकांचे नातेवाईक आहेत. कुटुंबीयांमध्ये एकमेकांशी संबंध बिघडल्याने नाराजी होती. एकमेकांशी बोलचाल बंद होती. शनिवारी रात्री दहा वाजता जनार्धन गवते आणि चैऱ्या ऊर्फ विक्की काळे हे दोघे राजीवनगरात बोलत होते. विक्कीने जनार्धन यांच्या कानशिलात मारली. त्यावरून दोघांत हाणामारी झाली. या भांडणाची माहिती कैलास पोटे, रोहिदास पोटे, राहुल पोटे, प्रकाश पोटे, सूरज काळे, बंडू पोटे, देवीदास पोटे, नंदा गदाई, भोला काळे यांच्यासह काही नातेवाईक राजीवनगरात पोहचले. तसेच दुसरीकडे इंदिरा गवते, आनंद गवते, राजू गवते, पुरुषोत्तम दुलांगे, संजू दुलांगे, गुणवंता दुलांगे, मनोहर दुलांगे, अंंबादास दुलांगे, गंगाराम दुलांगे, विजू दुलांगे, चंदन गवते, संतोष दुलांगे, अंकुश दुलांगे, अंकुश गवते, कैलास गवते, करण गवते, संजू दुलांगे, कविता दुलांगे हेसुद्धा तेथे आले. दोन्ही कुटुंबीय समोरासमोर आल्याने वाद वाढला.

हे ही वाचा…इसापूर धरणाचे सात दरवाजे उघडले; विदर्भ -मराठवाडा सीमेवरील गावांना सतर्कतेचा इशारा

दोन्ही गटात हाणामारी झाली. काहींनी तलवारी काढून एकमेकांवर हल्ला केला तर महिलांनी एकमेकींवर दगडफेक केली. काही वेळातच वस्तीत गोंधळ उडाला. काही जण रक्ताच्या थारोळ्यात पडले तर काही जण गंभीर जखमी झाले. तासभरानंतर एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळाली. ठाणेदार काळे ताफ्यासह घटनास्थळावर पोहचले. परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यास सुरुवात केली. परिस्थितीचा आढावा घेऊन वरिष्ठांना माहिती देण्यात आली. मध्यरात्रीनंतर तक्रारीवरुन दोन्ही गटांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

….यामुळे वाढला वाद

पोटे परिवारातील एका तरुणीचे लग्न दुलांगे कुटुंबियांचे नातेवाईक मायकर यांच्या कुटुंबातील मुलाशी जुळले होते. मात्र, प्रकृतीच्या कारणामुळे हे लग्न तुटले. तेव्हापासून दोन्ही परिवारांमध्ये नाराजी होती. लग्न तुटल्यानंतर दोन्ही कुटुंबीयांत वारंवार वाद होत होते. मात्र, शनिवारी पहिल्यांदा लग्न तुटल्यावरून वाद विकोला गेला. वादाचे रुपांतर थेट हाणामारीत झाले. काही जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. त्यापैकी चौघांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती आहे.

हे ही वाचा…बुलढाणा: हजारो भाविकांचा मेळा, पावणेचारशे दिंड्या; शेगावात गजानन महाराज पुण्यतिथीचा उत्साह

पाच ठार झाल्याची अफवा

आज रविवारी सकाळी राजीवनगरात झालेल्या हल्ल्यात पाच जण ठार झाल्याची अफवा समाजमाध्यमांवर पसरली. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. या अफवेमुळे पोलीस आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांनीसुद्धा घटनास्थळाला भेट दिली. कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. परिस्थिती नियंत्रणात असल्याची खात्री झाल्यानंतर परतले.

Story img Loader