नागपूर : शारजाहून नागपूरला आलेल्या एका प्रवाशाच्या पँट आणि बनियानच्या आत सोने असल्याचे आढळून आले. पेस्ट स्वरुपातील सोने पँट आणि बनियानच्या शिलाईमध्ये लपवण्यात आले होते. तस्कराला नागपूर विमानतळावरून शुक्रवारी पहाटे ताब्यात घेण्यात आले. गुप्त माहितीच्या आधारे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी शारजाहून आलेल्या प्रवाशांची कसून तपासणी केली. एका संशयिताच्या तपासणीत सोने तस्करीची बाब समोर आली.
एअर अरेबिया फ्लाइट क्रमांक जी९-४१५ ने शारजाहून नागपूरला येत असलेल्या मोहम्मद मोगर अब्बास याच्याकडून ५० लाख ७५ हजार रुपये किंमतीचे ८२२.५५० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. तसेच पाच लाख ९२ हजार ६१२ रुपये किंमतीचे आयफोन १५ प्रो मॅक्सचे पाच संच जप्त करण्ययात आले. याशिवाय ऍपल स्मार्ट घड्याळाचे सात नग किंमती तीन लाख ११ हजार ४२२ रुपये आणि ८ किलो केसर जप्त करण्यात आले. त्याचे बाजार मूल्य १७ लाख ४९ हजार २८० रुपये आहे.
हेही वाचा : निवडणुकीपूर्वी यवतमाळमध्ये सभा घेण्याचा पंतप्रधान मोदी यांचा पायंडा कायम
नागपूर सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजेंस युनिट आणि एअर कस्टम्स युनिटच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे तस्कराला पकडले. ही कारवाई सीमाशुल्क आयुक्त संजय कुमार आणि सीमाशुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त पीयूष भाटी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि देखरेखीखाली झाली.