वर्धा : शासनाच्या प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील चुकीच्या धोरणाविरोधात राज्यातील शिक्षक संघटनांनी तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांच्या बैठकीत १४ सप्टेंबर घेण्यात आला आहे. आंदोलन म्हटले की विविध स्वरूपात नाराजी किंवा संताप व्यक्त केल्या जात असतो. आता हुशार म्हटल्या जाणाऱ्या प्राथमिक शिक्षक संघटना नेत्यांनी विविध आयुधे नाराजी व्यक्त करण्यासाठी उपसली आहेत. वरिष्ठ शिक्षण अधिकारी, मंत्रालय सचिव, मुख्याध्यापक व शिक्षक नेते यांचाही वॉट्स अँप समूह आहे. त्वरित संदेशवहन, चर्चा, समस्या निराकरण, आदेश प्रसार व अन्य बाबीसाठी या माध्यमाचा उपयोग अधिकारी व शिक्षक नेते करतात. आंदोलनाचा एक भाग म्हणून १८ सप्टेंबर पासून शासकीय वॉट्स अँप ग्रुपमधून बाहेर पडत शासनाशी संवाद तोडल्या जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे नाराजी …

राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा, विद्यार्थी, शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांच्या सोडवणुकीकडे दुर्लक्ष केले आहे. ‌ संचमान्यता व २० अथवा २० पेक्षा कमी पटसंख्येच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमधील एक शिक्षक पद बंद करून कंत्राटी पद्धतीने सेवा निवृत्त शिक्षक नियुक्त करण्याचा निर्णय शिक्षक दिनी घेतला आहे. या दोन्ही निर्णयाच्या परिणामी विद्यार्थ्यांचे शिक्षणच बंद होण्याची स्थिती आहे. बालकांना दर्जेदार शिक्षणापासून दूर लोटण्याच्या निर्णयास सर्व क्षेत्रातून विरोध होणे गरजेचे आहे, असे शिक्षक नेते विजय कोंबे म्हणाले.

हे ही वाचा…अकोला : छायाकल्प चंद्रग्रहणासह सूपरमूनची पर्वण

काय ठरले बैठकीत

या संबंधाने पुणे येथे शिक्षक भवनात प्राथमिक शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक १४ सप्टेंबर संपन्न झाली. मंगळवार दि. १७ सप्टेंबर पासून शिक्षकांनी काळी फीत लावून विरोध प्रदर्शन करणे. बुधवार दि. १८ सप्टेंबर पासून वॉट्स अँपच्या च्या प्रशासनिक गृपमधून बाहेर पडून असहकार सुरू करणे. २५ सप्टेंबर रोजी सर्व शिक्षकानी रजेवर जात प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा काढणे अशाप्रकारे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत शासनाकडे नोटीस पाठविण्यात येणार आहे.

हे ही वाचा…कधी गणपतीसोबत सेल्फी,तर कधी ढोल वादन…फडणवीसांचे गणेश दर्शन….

प्राथमिक शिक्षक संघटना निर्धार बैठकीचे अध्यक्षस्थानी शिक्षक संघ (शिवाजीराव पाटील) राज्याध्यक्ष केशवराव जाधव होते. मार्गदर्शक म्हणून शिक्षक नेते संभाजीराव थोरात, उदयराव शिंदे होते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती चे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी प्रास्ताविक केले. प्रसाद पाटील, शिक्षक परिषदेचे राजेश सुर्वे, शिवाजीराव साखरे, किरण पाटील, शिक्षक सेनेचे चिंतामणी वेखंडे, नवनाथ गेंड ,अनिल पलांडे, मनोज मराठे, प्रभाकर झोड, सतिश कांबळे, संघटनेचे यादव पवार, निलेश देशमुख, ऊर्दू शिक्षक संघटनेचे साजीद अहमद, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे तुषार पाटील व शहाजी गोरवे, एम एड् कृती समितीचे राजू सावकार जाधव, इब्टा शिक्षक संघटनेचे उतरेश्वर मोहलकर, महाराष्ट्र शिक्षक समन्वय महासंघ मधुकर काठोळे, एकल शिक्षक सेवा मंचचे विकास खांडेकर, शिक्षक समितीचे राजन कोरगांवकर, राजन सावंत, पल्लवी गायकवाड, प्रकाश घोळवे, अंकुश काळे, पवन सुर्यवंशी, एस के पाटील, संजय नाईक, संजय जाधव, तुषार पाटील, शशिकांत पोवार आदी सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On september 14 primary teachers unions decided to protest against governments education policy pmd 64 sud 02