अकोला : ग्रहण म्हणजे निसर्गातील सावल्यांचा खेळ. १८ सप्टेंबरला बहुतेक भागात खंडग्रास तर काही भागात छायाकल्प स्वरूपात चंद्रग्रहण घडून येत आहे. याच वेळी पृथ्वी-चंद्र अंतर कमी झाल्याने आकाशात सुपरमून बघता येईल. खगोलीय घटनांची पर्वणी असून त्याचा आनंद घेण्याचे आवाहन विश्वभारतीचे संचालक प्रभाकर दोड यांनी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चंद्र पृथ्वीभोवती व पृथ्वी सूर्याभोवती फिरतांना एका महिन्यात दोनदा एका रेषेत येतात; परंतु भ्रमण कक्षेत सव्वा पाच अंशाचा कोन असल्याने दर पौर्णिमा व अमावास्येला ग्रहण होत नाही. चंद्र ग्रहणाच्या वेळी पृथ्वीची सावली दाट व विरळ पडते. अति दाट सावलीत खग्रास, दाट व विरळ सावलीत खंडग्रास, तर केवळ विरळ सावलीत छायाकल्प किंवा मांद्य चंद्रग्रहण घडते. या प्रकारचे ग्रहण महाराष्ट्र, गुजरात व राजस्थान राज्यातील पश्चिम भागात असेल. आपल्या भागात चंद्रबिंब फक्त मलीन झाल्यासारखे दिसेल. खंडग्रास चंद्रग्रहण पृथ्वीवरील उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, आफ्रिकेत दिसेल. तर अफ्रिकेतील पूर्वेकडील प्रदेशात दिसणार नाही. यासह आशिया, पश्चिम रशिया आणि अंटार्क्टिकाच्या काही भागांमधून दिसणार आहे.

हे ही वाचा…कधी गणपतीसोबत सेल्फी,तर कधी ढोल वादन…फडणवीसांचे गणेश दर्शन….

या सोबतच चंद्र व पृथ्वी यांच्यातील अंतर कमी असल्याने सुपरमून बघता येईल. हे अंतर तीन लाख ५७ हजार ४७५ कि.मी एवढे असेल. सूर्यमालेतील सर्वात सुंदर व वलयांकित असलेला शनी ग्रह रात्रभर चंद्राचे सोबत राहणार आहे, अशी माहिती प्रभाकर दोड यांनी दिली.

वर्षभरात चार सुपरमूनच्या घटना

शरद ऋतूतील पौर्णिमेत चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ येतो. या पौर्णिमेला चंद्र थोडा मोठा दिसतो. यंदाच्या वर्षात चार वेळा सुपरमूनची घटना अवकाशात घडणार आहे. यंदाच्या वर्षातील १८ तारखेला दिसणाऱ्या पौर्णिमेतील चंद्र हा दुसरा सूपरमून असेल जो पृथ्वीवरुन पाहता येईल. यावर्षात एकूण चार सुपरमूनच्या घटना होणार आहेत. ऑगस्टच्या ब्लू मूननंतर दिसणारा हा पहिला सुपरमून राहणार आहे. अवकाश प्रेमींनी याचा आनंद घ्यावा, असे आवाहन प्रभाकर दोड यांनी केले.

हे ही वाचा…अमरावती विभागात ‘आरटीई’च्‍या तब्‍बल ३४१६ जागा रिक्‍त ; शिक्षण विभागाच्‍या धरसोडीच्‍या धोरणामुळे विद्यार्थ्‍यांचे नुकसान

पुढील वर्षी ७ सप्टेंबरला खग्रास चंद्रग्रहण

आगामी २०२५ या वर्षात चंद्रग्रहण १४ मार्च रोजी होणार आहे. मात्र, ते भारतात दिसणार नाही. त्यानंतर येणारे ७ सप्टेंबर २०२५ रोजी दिसणारे खग्रास चंद्रग्रहण भारतात बघता येईल, असे प्रभाकर दोड यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On september 18 lunar eclipse is happening in most parts of continent and in some parts in form of shadow ppd 88 sud 02