नागपूर : धार्मिक एकतेचा, सलोख्याचा संदेश देणारे नागपूर शहर १७ मार्चच्या दंगलीने हादरून गेले होते. दाेन समूहात झालेल्या दंगलीनंतर येथे तणावाची परिस्थिती होती. गुढीपाडवा, रमजान ईद आणि राम नवमीच्या सणांना दंगल भागात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरवर्षी महाल आणि मोमिनपुरा या मुस्लीम बहूल भागात रामनवमीच्या शोभायात्रेचे जल्लोषात स्वागत केले जाते. त्यामुळे दंगलीनंतर यंदा या भागातील चित्र कसे असेल, असा प्रश्न सर्वांनाच पडला होता.
पोलीस प्रशासनानेही सुरक्षेची सर्व व्यवस्था केली होती. परंतु, उपराजधानीने पुन्हा एकदा शांती आणि एकतेचे दर्शन घडवले. रविवारी सायंकाळच्या सुमारास पोद्दारेश्वर मंदिरातून शोभायात्रा मोमिनपुरा प्रवेशद्वारासमोरून गेली. दरवर्षीप्रमाणे मुस्लीम बांधवांनी फुलांचा वर्षाव करत शोभायात्रेचे स्वागत केले आणि थंड पेय वितरित केले. यावेळी मोठ्या संख्येत भक्त सद्भावनेच्या वातावरणात चित्ररथांचा आनंद घेताना दिसले. यात मोठ्या प्रमाणात मुस्लीम महिला आणि मुलांचाही समावेश होता.
शहरातील प्रसिद्ध पोद्दारेश्वर राममंदिरातून रविवारी रामनवमीच्या दिवशी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचे गजर, सजवलेली रथयात्रा आणि भक्तांचा उत्साह यामुळे परिसर ‘राम’मय झाला होता. या शोभायात्रेला नागपूरकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून श्रद्धेचा जल्लोष व्यक्त केला. मार्च महिन्यातील मध्य नागपुरातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर धार्मिक एकतेचा, सलोख्याचा संदेश देत सद्भावनेच्या वातावरणात शोभायात्रेचे सर्वधर्मीय लोकांनी जागोजागी स्वागत केले. यंदा पोद्दारेश्वर मंदिरातून निघणाऱ्या शोभायात्रेचे ५९ वे वर्ष आहे. श्रीरामाच्या विशेष पूजनानंतर मंदिरातून शोभायात्रेला प्रारंभ झाला. आकर्षक फुलांनी सजवलेल्या रथात विराजमान श्रीराम, सीता, लक्ष्मण यांच्यासह ९० पेक्षा अधिक चित्ररथ शोभायात्रेत सहभागी झाले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, कृपाल तुमाने, पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांच्या हस्ते श्रीराम पंचायतनाचे पूजन होऊन शोभायात्रेला प्रारंभ झाला.
शोभायात्रेचे वैशिष्ट
शोभायात्रेत स्केटिंग पथक, प्रतिहारी दल, अश्वमेधाचा घोडा, शंखनाद दल, भजन मंडळी, नटराज क्रीडा मंडळाचे आदिवासी नृत्य, रामायण मंडळ, राम संकीर्तन दल यांचा समावेश होता. यानंतर बांकेबिहारी दर्शन, महालक्ष्मी जगदंबा कोराडी दर्शन, पंचमुखी हनुमान, बैद्यनाथ ज्योतिर्लिंग दर्शन, केदारनाथ धाम, महाकाली दर्शन, स्वामी समर्थ दर्शन, बालाजी दर्शन, कुंभकर्ण निद्रा, विष्णू अवतार, राधाकृष्ण सिंहासन, प्रयागराज महाकुंभ, वाल्मीकी रामायण रचना, शिवपार्वती विवाह, महर्षी सुदर्शन यांची आराधना, मारीच वध, तुळजा भवानी गोंधळ, महाकाल दर्शन, राम पंचायतन सजीव झांकी, गौमाता राजमाता दर्शन, नरसिंह अवतार, तुलसी रामायण कथा, भक्तीलीन हनुमान यासह विविध आकर्षक चित्ररथे लोकांचे लक्ष वेधून घेत होते. ही शोभायात्रा पोद्दारेश्वर राम मंदिर, हंसापुरी, बजेरिया, गोळीबार चौक, मार्गे इतवारी, सराफा बाजार, चितारओळ, बडकस चौक, केळीबाग रोड, शिवाजी चौक, टिळक पुतळा, शुक्रवारी तलाव, कॉटन मार्केट चौक, लोखंडी पूल, आनंद टॉकिज, मुंजे चौक, झांशी राणी चौक, व्हेरायटी चौक, मानस चौक मार्गे पुन्हा मंदिरात परत आली. शोभायात्रेच्या मार्गावर भगवे झेंडे यासह रांगोळी काढून स्वागत करण्यात आले.