अमरावती मार्गावरील निर्माणाधीन उड्डाणपूल ज्या ठिकाणी संपतो त्या ठिकाणी एका नाल्यावरील पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी नाल्यातून वाहणाऱ्या सांडपाण्याचा प्रवाह अडवण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधी आणि डासांचा त्रास सहन करावा लागत आहे.
अमरावती मार्गावरील आरटीओ कार्यालय ते आदिवासी भवनादरम्यान एक नाला आहे. हा नाला पुढे नाग नदीला जाऊन मिळतो. या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करत आहे. त्यासाठी पाण्याचा प्रवाह अडवण्यात आला. त्यानंतर थोडेफार पाणी वाहून जावे म्हणून एक पाईप टाकण्यात आला. पण, पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने पाणी साचू लागले. गेल्या दोन महिन्यापासून येथे पाणी साचल्याने दुर्गंधी येत आहे. तसेच डासांची उत्पत्ती होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून या भागात डासांची संख्या वाढल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.
आरटीओ कार्यालय परिसरात कार्यरत असलेल्यांना अळ्या आढळून आल्या आहेत. पाण्यात कचरा देखील टाकण्यात येत आहे. आरटीओजवळील विक्रेते नाल्यात कचरा टाकतात, त्यामुळे स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. या ठिकाणी दुर्गंधी इतकी आहे की, नाल्याजवळ उभेही राहता येत नाही, असे एका रहिवाशाने सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या म्हणण्यानुसार, पुलाची पुनर्बांधणी करायची असल्याने पाण्याचा प्रवाह वळवण्यात आला आहे, अडवलेला नाही. पाणी वाहते राहिल्यास बांधकाम करणे शक्य नाही. पुलाचे काम मेअखेर पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. दोन्ही बाजूने नाल्याची स्वच्छता करण्यात यावी. तसेच नाल्यात कचरा टाकला जाणार नाही, याची काळजी महापालिकेने घ्यावी आणि पुलाचे काम लवकरात लवकर करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नियोजन चुकले
संभावित समस्या लक्षात घेऊन प्रशासकीय यंत्रणेने वेळीच उपाययोजना केल्यास असे प्रश्न निर्माण होत नाही. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे नियोजन चुकल्यामुळे पाणी साचत असून डांसाची उत्पत्ती वाढत आहे.
पाण्याचा प्रवाह बंद केल्यामुळे सांडपाणी साचले आहे. दुर्गंधी येत आहे. डासांचा प्रार्दुभाव वाढला आहे. त्यामुळे आजाराचा धोका आहे. पाणी वाहते ठेवणे आवश्यक आहे. तसेच साचलेल्या पाण्यात कचरा टाकणाऱ्यांवर निर्बंध आणावे लागतील.- दिलीप जाधव, सचिव, त्रिनयन सोसायटी, प्रियदर्शनी कॉलनी