नागपूर : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाचपावलीतील कमाल चौकात पाच ते सहा जणांच्या टोळीने एका युवकाला भरदिवसा चाकू-तलवारीने भोसकून ठार केले. पहिल्याच दिवशी झालेल्या हत्याकांडामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. राजेश मेश्राम (उप्पलवाडी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी चार आरोपींना अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश मेश्राम हा पाण्याच्या बाटल्या पुरवठा करण्याचा व्यवसाय करतो. त्याचा आरोपी मनोज गुप्तासोबत गेल्या काही दिवसांपासूद वाद सुरू होता. शनिवारी सायंकाळी मनोज आणि राजेश यांची समोरासमोर भेट झाली. त्यावेळी राजेशने मनोजला शिवीगाळ करीत धमकी दिली होती. त्यामुळे तो चिडला होता. त्याने राजेशचा काटा काढण्याचा कट रचला. त्याने आपल्या पाच ते सहा साथिदारांना कटात सहभागी करुन घेतले. त्यात शुभम डोंगरे, जॉकी विश्वकर्मा यांचाही समावेश आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी रविवारी राजेशचा खून करण्याचा कट रचण्यात आला. राजेश हा दुचाकीने कमाल चौकातून जात होता. मनोज गुप्ता आणि त्याचे साथीदार कारने तेथे आले. हातात तलवारी-चाकू घेऊन कारमधून खाली उतरले. त्यांनी लगेच राजेशवर तलवारीने हल्ला केला आणि पळून गेले. राजेशचा घटनास्थळीच मृत्यू झाला. बंदोबस्तात तैनात असलेला एकही पोलीस कर्मचारी त्या रस्त्यावर भरकटला नाही. त्यामुळे बंदोबस्तावरही संशय निर्माण झाला आहे.

Story img Loader