नागपूर: नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळ परिसरात विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक झाले. त्यांनी परिसरात मोर्चा काढत “शेतकरी झाला कासावीस, खोके सरकार ४२०” म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. याप्रसंगी विरोधकांच्या गळ्यात संत्री- वांग्याची माळ सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
महाविकास आघाडीद्वारे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विधानभवन परिसरात आज मोर्चा काढत आंदोलन केले गेले. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी गळ्यात संत्री, वांगी यांची माळ घालून आंदोलन केले. याप्रसंगी विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर “शेतकऱ्यांच्या डोळ्याला पाझर, सरकार दाखवतंय गाजर”, “शेतकरी झाला कासावीस, खोके सरकार चारसो बीस”, “विमा कंपन्या झाल्या मालामाल, शेतकरी झाला कंगाल” आणि इतरही निदर्शने केली.
हेही वाचा… एक कार्यालय अन् दोन गट; राष्ट्रवादीतील फुटीचे अधिवेशनात पडसाद
आंदोलनात विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, सुनील प्रभू , नाना पटोले, अनिल देशमुख, अभिजित वंजारी, वर्षा गायकवाड, बाळासाहेब थोरात, रवींद्र धंगेकर, अशोक चव्हाण आणि इतर विरोधी पक्षाचे आमदार उपस्थित होते. सगळ्यांनी यावेळी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी केली.