‘लोकसत्ता’मार्फत पुढे आलेल्या विचाराला चळवळीचे रूप

मानधनाची रक्कम शेतकरी कुटुंबाला देण्याची विनंती

केवळ कथा, कविता, कांदबऱ्यातून शेतकऱ्यांची व्यथा मांडून भागणार नाही. त्या व्यथांना वाचा फोडण्यासाठी प्रत्यक्ष कृती व्हायला हवी, असा संवेदनशील विचार करून यवतमाळात प्रस्तावित साहित्य संमेलनातील काही मान्यवर निमंत्रितांनी त्यांच्या वाटय़ाचे मानधन व प्रवासखर्च शेतकरी कुटुंबाला दिला जावा, असा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आयोजकांनाही कळवण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, यवतमाळातील शेतकरी आत्महत्यांचे विदारक सत्य डोळ्यापुढे ठेवून हे संमेलन साधेपणाने व्हावे व आर्थिकदृष्टय़ा सक्षम निमंत्रितांनी मानधन व प्रवासखर्च नाकारून तो निधी शेतकरी विधवांना द्यावा, असा एक विचार साहित्य विश्वाने ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून मांडला होता.

त्या विचाराला आता चळवळीचे रूप लाभत असून संमेलनातील विविध सत्रात निमंत्रित साहित्यिकांनी या विधायक कार्यासाठी पुढाकार घेऊन आपल्या लेखणीची शेतकऱ्यांप्रती असलेली बांधीलकी व्यक्त केली आहे. नेमक्या काय आहेत, या साहित्यिकांच्या भावना हे त्यांच्याच शब्दात येथे मांडतो आहोत.

पोशिंद्याचे आम्हीही देणे लागतो

साहित्य संमेलनातील निमंत्रित साहित्यिकांनी मानधन नाकारावे आणि ती रक्कम आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना देण्यासाठी सहकार्य करावे, असा एक विचार दै. लोकसत्ताच्या माध्यमातून पुढे आला आहे. त्याला माझा पाठिंबा आहे. मी स्वत:ही संमेलनात निमंत्रित असून माझे मानधन मी शेतकऱ्यांच्या हितासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. यातून काही कुटुंबांना थोडी जरी मदत मिळाली तरी ते मोठे काम होईल. शेवटी या पोशिंद्याचे आम्हीही देणे लागतो, हे विसरून चालणार नाही.

– डॉ. हेमंत खडके, अमरावती</p>

 मानधन नाकारलेच, आर्थिक मदतही दिली

मीसुद्धा एका सत्रात वक्ता म्हणून निमंत्रित आहे. यवतमाळातील शेतकऱ्यांची अवस्था बघता मानधन न घेण्याचे मी आधीच निश्चित केलेले आहे. तसा निर्णय संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांना कळवलेला आहे. याशिवाय संमेलनाच्या आयोजनासाठी मदत म्हणून पाच हजार रुपयांचा धनादेशसुद्धा मी स्वत:च आयोजकांना दिला आहे.

– डॉ. काशिनाथ बऱ्हाटे, परतवाडा

सुरुवात घरापासूनच हवी होती

हे संमेलन माझ्या गावातच होत आहे वा मी संमेलनाच्या कार्याध्यक्षांचा मुलगा आहे म्हणून मी मानधन नाकारले असे नाही. या वैचारिक स्थित्यंतराची सुरुवात आपल्या घरातूनच व्हावी, हा त्यामागचा माझा प्रामाणिक हेतू आहे. शेतकऱ्यांची अवस्था खरच खूप वाईट आहे. ती मानधन नाकारल्याने एका रात्रीत बदलेल असे नाही. पण, व्यासपीठ कुठलेही असो पहिले पाऊल पडणे गरजेचे होते. ते पडले त्याचा आनंद जास्त आहे.

– डॉ. प्रणव कोलते, यवतमाळ</p>

रकमेचा योग्य विनियोग व्हावा

मी अकोल्यासारख्या शेतकरी बहूल जिल्हयातील आहे. शेतकऱ्यांची आजची स्थिती अतिशय जवळून पाहत आहे. या संमेलनाच्या या विषयाकडे गांभीर्याने लक्ष वेधले जावे, ही माझी भूमिका आहे. त्यासाठीच मी मानधन व प्रवासखर्च नाकारला असून या निधीचा शेतकऱ्यांच्या हितासाठी योग्य विनियोग व्हावा, असे आयोजकांना कळवले आहे.

– मोहिनी मोडक, अकोला</p>

Story img Loader