नागपूर: श्री गणेशाच्या आगमणाच्या पहिल्याच दिवशी शनिवारी नागपूरसह राज्यभरात सोन्याच्या दरात घसरण झाली होती. परंतु आता हळू- हळू दर वाढताना दिसत आहे. गणेशोत्सवाच्या तिसऱ्याच दिवशी सोन्याच्या दरात किंचित वाढ झाल्याने ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे. दरम्यान नागपुरातील सराफा व्यवसायिकांकडून मात्र लवकरच सोन्याच्या दरात आणखी वाढीचे संकेत दिले जात आहे.
नागपूरसह राज्यभरात शनिवारी (७ सप्टेंबरला) श्री गणेशाचे वाजत- गाजत आगमन होऊन मूर्तींची प्रतिष्ठापना झाली आहे. दरम्यान गणेशोत्सवातही अनेक भाविक श्री गणेशाची विविध धातूची मूर्तीसह इतरही साहित्य व दागिन्यांची खरेदीसाठी सराफा व्यावसायिकांकडे गर्दी करतात. त्यामुळे ग्राहकांमध्ये या काळातही सोने- चांदीच्या दरांचे आकर्षण असते. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात घट झाली असली तरी आता दर वाढत आहे.
हेही वाचा – Ajit Pawar : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विदर्भात धुसफूस, ‘हे’ आहे कारण
नागपुरातील सराफा बाजारात गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी ७ सप्टेंबरला सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७१ हजार ७०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६६ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५५ हजार ९०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४६ हजार ६०० रुपये होते. हे दर ९ सप्टेंबरला दुपारी १ वाजता नागपुरात २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७१ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६६ हजार ८०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५६ हजार रुपये, १४ कॅरेटसाठी ४६ हजार ७०० रुपये होते. त्यामुळे सोन्याच्या दरात किंचित वाढ झाल्याचे दिसून येते. दरम्यान आजही शहरात वाढदिवस, बारसे, लग्नसमारंभासह इतर कामासाठीही बरेच नागरिक सोने- चांदीचे दागिनेसह इतरही भेटवस्तू देतात. त्यामुळे या पद्धतीचे दागिने खरेदीसाठी इच्छुक असलेल्या ग्राहकांमध्ये सोन्याच्या दरवाढीने चिंता वाढली आहे. दरम्यान नागपुरातील सराफा व्यावसायिकांकडून मात्र येत्या काळात सोन्याचे दर आणखी वाढण्याचे संकेत दिले जात आहे. त्यामुळे ही दागिने खरेदीसाठी चांगली वेळ असल्याचा सराफा व्यावसायिकांचा दावा आहे.
हेही वाचा – महावितरणला थकबाकीचा ‘झटका’
चांदीच्या दरात मात्र घसरण
नागपुरातील सराफा बाजारात गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे ७ सप्टेंबरला चांदीचे दर प्रति किलो ८३ हजार ५०० रुपये होते. हे दर तीन दिवसानंतर ९ सप्टेंबरला नागपुरात ८३ हजार रुपये प्रति किलो आहे. त्यामुळे चांदीच्या दरात ५०० रुपये प्रति किलोची घट दिसत आहे. दरम्यान नागपुरात प्लॅटिनम धातूचे दर मात्र स्थिर दिसत आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशीपासून (७ सप्टेंबर) आजपर्यंत (९ सप्टेंबर) नागपुरात प्लॅटिनमचे दर प्रति दहा ग्राम ४४ हजार रुपये आहेत.