नागपूर : चंद्र… पृथ्वीचा एकुलता एक उपग्रह. काळ कुठलाही असो, चंद्राची अंगभूत शीतलता आणि त्याच्या मोहक रूपाचे मानवाला कायम आकर्षण वाटत आले आहे. बालपणी लिंबोणीच्या झाडामागे दडणारा पहिला मित्र… तारुण्यात सुरांच्या खांद्यावर स्वार होऊन चांदण्याचे कोष जीवलगापर्यंत पोहचवणारा सोबती… आणि आयुष्याच्या अंतिम गंतव्यस्थानावर जाताना आर्त आठवांची निळी गोधळी अंगावर पांघरणारा नभाचा मानकरी… स्वयंप्रकाशी नसूनही समष्टीला प्रकाशाचे दान वाटणाऱ्या चंद्रावर आजच्याच दिवशी पहिले मानवी पाऊल पडले…

पहिले पाऊल पडण्याआधी लक्ष मनांच्या इंद्रगुहांतून तो कायमच भटकत राहिला. कधी देवाची अलौकिक कला म्हणून तर कधी सूर्याच्या सोबतीने समुद्रात भरती-ओहोटी घडवणारा जादूगार म्हणून… २० जुलै १९६९ साली नील आर्मस्ट्राँग प्रत्यक्ष चंद्रावर उतरला आणि त्याने धरतीवर संदेश धाडला, ‘तप्त लाव्हामधील चमकदार गंधक रेंगाळत हिमकणांसारखा जिथे खाली कोसळतो आणि विद्याुतभारित होऊन एक कोटी अॅम्पिअर एवढ्या प्रखर विजा येथे कायम धारानृत्यात दंग असतात ती जागा म्हणजे, चंद्र!’ या संदेशाने प्रेयसीपुढे लालबुंद गुलाब धरून… ‘तेरे वास्ते फलक से मै चाँद लाऊंगा…’ वैगेरे म्हणणारे हादरलेच असतील. समग्र जगासाठी तर हा मोठाच सांस्कृतिक धक्का होता. कारण, ‘ईद’च्या नमाजला अल्लाहपुढे नतमस्तक व्हायलाही पहिली परवानगी लागायची ती चंद्राचीच आणि पौर्णिमेची पूजा बांधताना पहिली आरती व्हायची तीही या चंद्राचीच… परंतु, हा सत्तावीस नक्षत्रांचा स्वामी वगैरे असलेला व दक्षपुत्री रोहिणीवर भाळून चकाकणारा चंद्र प्रत्यक्षात अग्निजन्य खडक आहे, या वास्तवाचे माणसाला प्रथमच भान आले असणार… पण चंद्राच्या वास्तविक रूपाचे कितीही वैज्ञानिक दाखले दिले तरी शेकडो कवी, शायरच्या आयुष्यातील ‘एकसो सोला चाँद की रातें…’ कायम प्रज्वलित होत राहिल्या… तसेही माणसाला चंद्राचा लळा लावण्यात कवी, शायरचे योगदान मोठेच…

हेही वाचा >>>Nagpur Rain News: सोनेगाव पोलीस ठाण्यात चार फूट पाणी, पोलीस खुर्चीवर उभे राहून बजावत होते कर्तव्य

‘‘लिंबोणीच्या झाडामागे कधी लपतो मुलाप्रमाणे…

पीन स्तनांच्या दरेत केव्हा चुरुन जातो फुलाप्रमाणे…’’ हे कुसुमाग्रजांनी केलेले वर्णन असो, किंवा

‘‘तू कुठेही जा, सुखी हो, चंद्र माझा साथ आहे

गीत माझे घेऊनी जा, प्राण माझा त्यात आहे…’’ हे मंगेश पाडगावकरांचे जोडीदाराला आश्वस्त करणारे शब्द असोत… त्यांच्या अवीट गोडीने चंद्राला मराठी संस्कृतीचा अविभाज्य अंग बनवले. भारतात जन्मलेल्या उर्दू भाषेचा प्रेरणास्थानच वाटावा इतका चंद्र या भाषेत झिरपला.

इब्ने इंशाच्या

‘‘कल चौदहवीं की रात थी शब भर रहा चर्चा तिरा

कुछ ने कहा ये चाँद है कुछ ने कहा चेहरा तिरा…’’ या गझलमध्ये प्रेयसीचा चेहरा आणि चंद्र यांची तुलना होते. तर कधी

‘‘वो कौन था जो दिन के उजाले में खो गया

ये चाँद किस को ढूँडने निकला है शाम से…’’ या आदिल मंसूरींच्या शब्दांतून तो डोकावतो…

हजारो वर्षांपासून मानवी संस्कृतीला व्यापून उरलेल्या अशा चंद्रावर आता म्हणे वस्ती होणार आहे. पण उद्या चंद्रभूमीवरील घराच्या ओसरीत बसून ‘एकसो सोला’ रात्री प्रत्यक्ष मोजता येतीलही, पण ‘जा रे चंद्रा क्षणभर जा ना मेघांच्या पडद्यात’… अशी आर्जव त्याला कसे करता येईल?