लोकसत्ता टीम
अमरावती : आपल्या देशात दरवर्षी ५ लाखांहून अधिक अपघात होतात आणि दीड लाखांहून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागतात. दहशतवादात बळी गेलेल्यांची संख्या किंवा कोविड काळात झालेले मृत्यू याहून अधिक मृत्यू हे रस्ते अपघातांमध्ये होतात, हे आपण गेल्या काही वर्षांत पाहिले आहे. अनेक परिवारांना आपला आधार गमवावा लागला आहे, अशी खंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी येथे बोलून दाखविली. येथील प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार डॉ. अनिल बोंडे, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार आदी उपस्थित होते.
नितीन गडकरी म्हणाले, अपघातांसाठी कारणीभूत ठरणाऱ्या बाबींपैकी रस्ते अभियांत्रिकी हा एक महत्वाचा विषय आहे. देशातील महामार्गांवरील अपघातप्रवण स्थळांची निश्चिती करून तेथील रस्ते सुधारणेसाठी ५० हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्रात देखील सुधारणा होत आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेला महत्व देण्यात येत आहे. सर्वाधिक जीएसटी देणारे क्षेत्र म्हणून ऑटोमोबाईल क्षेत्र पुढे आले आहे. आता इथेनॉल मिश्रित इंधनावर भर देण्याची गरज आहे.
आणखी वाचा-शिवरायांचा पुतळा पाडला?…. ज्यांनी हे काम….प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यामुळे….
इलेक्ट्रिक वाहने देशात लोकप्रिय होत आहेत. येत्या काळात सार्वजनिक वाहतूक अधिक बळकट करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. जेव्हा मुंबई-पुणे द्रूतगती महामार्ग तयार होत होता, तेव्हा अनेकांनी हे शक्य नसल्याचे बोलून दाखवले होते. पण, लगेच कमी वेळात मुंबई-पुणे अंतर कापणे शक्य झाले, असे गडकरी म्हणाले.
नितीन गडकरी म्हणाले, येणाऱ्या काळात देशातून पेट्रोल, डिझेलला हद्दपार करावे लागणार आहे. वाहतूक पद्धतही बदलत जाणार आहे, मेळघाट सारख्या परिसरात चालक प्रशिक्षण केंद्र सुरू करणे गरजेचे आहे. देशात चालकांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे, चालकाने फक्त आठ तास ड्रायव्हिंग करावे असा नियम करणार आहे. वाहन चालकांना व्यवस्थित परीक्षा घेऊन त्यांना परवाने देण्यात यावे, परवाने देण्यात भ्रष्टाचार होऊ नये, एका चालकावर अनेकांचे जीवन अवलंबून असते, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.
आणखी वाचा-Sexually Assaulted Minor Girl : अल्पवयीन मुलीला खोलीवर बोलावले आणि दोन शिक्षकांनी….
गडकरी म्हणाले, आपल्या देशाला ऑटोमोबाईल उद्योगांतून साडेचार कोटी रोजगार मिळतो. येणाऱ्या काळात या उद्योगांमध्ये भारत जगात पहिल्या क्रमांकावर राहिल. देशात शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी इथेनॉल धोरण आणले, देशात लवकरच ४०० इथेनॉल पंप सुरू करू, त्यामुळे वाहतूक स्वस्त होणार आहे.