लोकसत्ता टीम
यवतमाळ : मारेगाव तालुक्यातील टाकळी (कुंभा) गावात रात्रीच्या वेळेत घरात सर्पदंश झाल्याने दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री घडली. काव्या वैभव खेवले असे मृत बालिकेचे नाव आहे.
काव्याला मण्यार या अतिविषारी सापाने दंश केला. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच तिला तत्काळ मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र ठिकाणी तिच्यावर योग्य उपचार न झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
आणखी वाचा-शहरी भागातील विद्यार्थिनींनी ग्रामीण भागातून मिळविला प्रवेश, मग उच्च न्यायालयात गेले प्रकरण अन्…
या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. वेळेवर उपचार मिळाले असते तर तिचे प्राण वाचवता आले असते, असे ग्रामस्थांनी सांगितले. ग्रामस्थांनी आरोग्य प्रशासनाला धारेवर धरले असून, काव्याच्या मृत्यूला आरोग्य विभागच जबाबदार असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
सध्या सर्वत्र अवकाळी पाऊस सुरू असून उकडाही वाढला आहे. त्यामुळे साप बिळातून बाहेर पडत आहे. ग्रामीण भागात सर्पदंश झाल्यास तत्काळ औषधोपचार मिळत नसल्याने या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी आहे.