वर्धा : मानव प्राण्यांप्रमाणेच पशूंनाही उन्हाची काहिली त्रस्त करू लागली आहे. उष्माघाताचा फटका प्राण्यांनाही बसण्याच्या पशुपालक शेतकरी तक्रारी करीत आहे. त्यासाठी पशुपालन विभाग तयारीला लागला आहे. सर्वाधिक काळजी म्हशींची घेणे आवश्यक ठरत आहे. कारण एकच, म्हशींना असणाऱ्या घामग्रंथी पुरेशा प्रमाणात सक्रिय नसतात. त्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहत नाही. घाम जात नसल्याने तसेच रंग उष्णता शोषक काळा असल्याने म्हशींना उन्हाची पटकन बाधा होत असल्याचे पशू वैद्यकीय डॉक्टर सांगतात.
गाईच्या तुलनेत म्हशीत घामग्रंथी सत्तर टक्के कमी असतात. परिणामी घामावाटे फारशी उष्णता बाहेर पडत नाही. कातडी तुलनेने जाड असल्याने उन्हाची तीव्रता वाढली की ती लगेच तापते. म्हणून म्हशींना पाण्यात पहुडणे आवडत असल्याचे दिसून येते. तशी काळजी पशुपालक शेतकऱ्यांनी घ्यावी, अशी सूचना आहे. तसेच चाऱ्यासाठी बाहेर पाठवू नये. माजाचे प्रमाण इतर पशुंपेक्षा अधिक असते. उन्हाचे प्रमाण कमी झाल्यावरच माज भरवावा. वळू फिरवून माज ओळखल्यानंतर निर्णय घेण्याची सूचना आहे. तसेच भूक कमी होत असल्यास विशिष्ट चारा देण्याची खबरदारी घ्यावी लागणार आहे. म्हशींना या तळपत्या उन्हात जपण्यासाठी काळजी घेणे आवश्यक ठरले आहे.