महेश बोकडे
आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांच्या नावाने प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याकडूनच २५ लाखांची लाच घेताना मंगळवारी एकाला अटक झाली होती. दुसरा आरोपी फरार आहे. हे प्रकरण ताजे असतानाच डॉ. मिर्झा यांच्या नावानेच यवतमाळमधील आरटीओतील एका अधिकाऱ्याला अडीच कोटींच्या लाचेची मागणी झाल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे आमदाराच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यवतमाळच्या ‘आरटीओ’ अधिकाऱ्यालाही अडीच कोटी मागितले? दोन्ही लाचखोरांच्या संभाषणाचा तपशील समोरकाँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना १७ मार्च २०२३ रोजी लिहिलेल्या पत्राचा आधार घेत दिलीप खोडे आणि शेखर भोयर या दोन्ही आरोपींनी आरटीओ अधिकाऱ्याला घाबरवलेे. या प्रकरणात तक्रार आल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून एका आरोपीला अटक केली. पडताळणीदरम्यान आरोपींमध्ये संभाषण झाल्याची सूत्रांची माहिती आहे. आरोपींच्या संभाषणात यवतमाळ जिल्ह्यातील पिंपळखुटी, ता. केळापूर येथील वाहनचालकांच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील एका अधिकाऱ्यांकडून लूट केली असून हा विषय आमदार डॉ. मिर्झा यांनी उचलल्याचाही मुद्दा उचलल्याचे समोर आले. तेथील आरटीओच्या अधिकाऱ्यासोबत दिलीप खोडे व शेखर भोयर यांच्या मुंबईत भेटी झाल्या. आरोपींकडून संबंधित अधिकाऱ्याला सुमारे अडीच कोटींच्या लाचेची मागणी झाली. यवतमाळच्या आरटीओतील एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर असे घडल्याबाबत दुजोरा दिला. त्यामुळे यवतमाळच्या प्रकरणाच्याही चौकशीची शक्यता असल्याने मिर्झा यांच्या अडचणी वाढू शकतात.
हेही वाचा >>>चंद्रपूर व बल्लारपूर शहर रामनामात तल्लीन; सर्वत्र तोरण, पताका, स्वागतकमानी, रोषणाई
माझ्या नावाचा गैरवापर
नागपूर आणि यवतमाळच्या आरटीओ अधिकाऱ्याला लाच मागितल्याच्या प्रकरणाशी माझा संबंध नाही. नागपूर प्रकरणातील एक आरोपी दिलीप खोडेला मी ओळखत नाही. दुसरा आरोपी शेखर भोयर हा एक निवडणूक लढला असल्याने माझा त्याच्याशी परिचय आहे. परंतु त्याच्या गैरप्रकाराची माहिती मला माध्यमातून मिळाली. यवतमाळच्या एका आरटीओ अधिकाऱ्याचा प्रश्न मी सभागृहात उपस्थित केल्यावर त्यावर चर्चा झाली. मंत्र्यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यावर हा मुद्दा निकाली निघाला. माझ्या नावाचा गैरवापर झाल्याचे दिसत आहे.- डॉ. वजाहत मिर्झा, आमदार.
हेही वाचा >>>बुलढाणा : दीड लाखांवर शेतकऱ्यांना दिलासा; १७४ कोटींची भरपाई मिळणार, रक्कम खात्यात जमा होण्यास सुरुवात
चौकशी झाल्यावरच स्पष्टता
नागपुरातील आरटीओ अधिकाऱ्याला लाच मागितल्याच्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आतापर्यंत आमदार डॉ. मिर्झा यांचा या प्रकरणातील सहभाग आणि यवतमाळच्या आरटीओ अधिकाऱ्याला लाच मागितल्याचे प्रकरण माझ्यापर्यंत आले नाही. परंतु काही आक्षेपार्ह बाब पुढे आल्यास नियमानुसार कारवाई होईल.