बुलढाणा: विकासप्रेमी नागरिकांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेणारी वन बुलढाणा मिशनची आज सकाळी निघालेली पदयात्रा संदीप शेळके यांचे जंगी शक्ती प्रदर्शन ठरले. नवरात्रीच्या अष्टमीच्या मुहूर्तावर आयोजित व अध्यात्म व कृषी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या पदयात्रेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले.
आटपाट बुलढाणा नगरीचे ग्रामदैवत असलेल्या चिखली राज्यमार्गावरील जगदंबा माता मंदिर येथून बहुचर्चित पदयात्रेला आज सकाळी प्रारंभ झाला. अग्रभागी विकास रथ, पोळ्याप्रमाणे सजविलेल्या व जिल्ह्यातील मुख्य पिके दर्शविणाऱ्या बैलगाड्या, त्यापाठोपाठ टाळ मृदुंगाच्या तालावर विठूमाउलीसह विकासाचा गजर करणारे वारकरी, त्यांच्यासोबत शाहू परिवाराचे संदीप शेळके व मालती शेळके हे दाम्पत्य, सहभागी हजारो नागरिक, त्यांच्या हाती असलेले विकासाच्या मागणीचे फलक असा पदयात्रेचा थाट होता. वाटेत ठीकठिकाणी संदीप शेळकेंचे औक्षण करण्यात आले. चिखली मार्गवरून मार्गक्रमण करणाऱ्या या यात्रेने येळगाव येथे थोडा विसावा घेत चिखलीकडे कूच केले. पदयात्रेची चिखली येथे रेणुका मातेचे दर्शन घेऊन सांगता होणार आहे.
हेही वाचा – नागपूर : बुकी सोंटू जैनची नव्याने चौकशी होणार, शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी
हेही वाचा – “आम्ही काम कसे करायचे?” लहान संस्थांचा आयकर खात्यास सवाल
मागासलेपणाचे सीमोल्लंघन अन शक्तीपीठांना साकडे
पदायात्रेदरम्यान माध्यमाशी बोलताना संदीप शेळके यांनी आपली भूमिका मांडली. अविकसित बुलढाणा जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध वन बुलढाणा मिशनच्या माध्यमाने जिल्ह्यात १५ ठिकाणी संवाद यात्रा काढण्यात आली. उत्साही प्रतिसाद लाभलेल्या यात्रेदरम्यान ग्रामीण नागरिकांच्या विकासाच्या अपेक्षा जाणून घेत जनतेचा जाहीरनामा तयार करण्यात येणार आहे. परिवर्तन पदयात्रामधून दोन शक्तिपिठांना जिल्ह्याच्या विकासासाठी साकडे घालणार असल्याचे ते म्हणाले.