लोकसत्ता टीम
यवतमाळ : मर्कटलीलांसाठी माकडं परिचित आहेत. पण, माकडांच्या या लीला अनेकदा जीवघेण्या ठरतात. अशीच घटना राळेगाव तालुक्यात घडली. रस्त्यावरून दुचाकीने गावाकडे जात असलेल्या तरूणाच्या दुचाकीवर माकडाने अचानक उडी घेतली. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर, मागे बसलेला आठ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला.
राळेगाव तालुक्यातील कोच्ची ते खैरी या मार्गावर घडलेल्या या घटनेत अनुप भारत कुमरे (२०), रा. कोच्ची हा तरूण जागीच ठार झाला, तर स्वराज विपूल ठाके (८), रा. कोच्ची हा बालक गंभीर जखमी झाला. अनुप आणि स्वराज हे दोघे दुचाकी (क्र. एमएच २९, एझेड २४४१) ने खैरीहून कोच्ची गावाकडे जात होते. खैरीपासून काही अंतरावर एका शेताजवळ चिंचेच्या झाडावर माकडे खेळत होती. याचवेळी एका माकडाने थेट धावत्या दुचाकीवर उडी मारली. त्यामुळे अनुपचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व अपघात झाला. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो जागीच ठार झाला. दुचाकीवर मागे बसलेला स्वराज फेकल्या गेल्याने तोही गंभीर जखमी झाला. नागरिकांनी त्याला तातडीने सेवाग्राम येथे उपचारासाठी रवाना केले.
भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकली गंभीर
आर्णी येथील आदर्श नगरात एका दोन वर्षीय चिमुकलीवर भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याने बालिकी गंभीर जखमी झाली. सकीना मोहसीन शेख, रा. आदर्श नगर असे जखमी बालिकेचे नाव आहे. ती घरासमोर खेळत असताना भटक्या कुत्र्याने या चिमुकलीवर अचानक हल्ला केला. तिची मान कुत्र्याने पकडून ठेवली. तिच्या आईने तिला कुत्र्याच्या तावडीतून सोडविण्या प्रयत्न केले, मात्र कुत्रा तिला सोडत नव्हता.
अखेर नगारिकांनी कुत्र्याला मारून पिटाळून लावल्यानंतर तिची त्याच्या तावडीतून सुटका झाली. जखमी बालिकेस तातडीने उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी वणी येथे भटक्या कुत्र्याने नऊ वर्षीय मुलावर हल्ला करून गंभीर जखमी केले होते. आता आर्णी येथेही तशीच घटना घडल्याने भटक्या कुत्र्यांबाबत शासानाने उचित धोरण ठरविण्याची मागणी नगारिकांनी केली आहे.
तलवारीने केक कापून दहशत पसरविणे अंगलट
वाढदिवसानिमित्त तलवारीने केक कापून दहशत माजविणाऱ्या तरूणास ताब्यात घेऊन पोलिसांनी आरोपीसह धारदार तलवार जप्त केली. ही घटना आर्णी तालुक्यातील इवळेश्वर येथे घडली. स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळच्या पथकाने ही कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व आर्णी पोलीस अवैध धंद्यााविरुध्द कारवाईकरीता पेट्रोलिंग करत असताना, तालुक्यातील इवळेश्वर येथे कुणाल ऊर्फ अजय प्रकाश बनसोड याने आपल्या वाढदिवसानिमित्त गावातील रस्त्यावर बुलेट दुचाकीवर तलवारीने केक कापून गावात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला, अशी गोपनीय माहिती मिळाली.
पथकाने तत्काळ इवळेश्वर येथे पोहचून कुणाल ऊर्फ अजय प्रकाश बनसोड (२५), यास ताब्यात घेऊन विचारपूस केली. पोलिसांनी केक कापून दहशत पसरविण्याकरीता वापरलेली धारदार तलवार, मोबाईल, व बुलेट असा एकुण एक लाख ६१ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आर्णी पोलिसांच्या ताब्यात दिले.