नागपूर शहरातील खेळांडूना चांगली मैदाने असावी यासाठी शहरातील विविध भागातील मैदानाच्या पुनर्विकासाठी शंभर कोटी रुपये राज्य सरकारकडून दिले जाईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोपाच्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा- नागपूर : बाळासाहेब ठाकरे स्मृती केंद्राचा प्रस्ताव अजूनही कागदावरच
यशवंत स्टेडियम येथे झालेल्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ग्रेट खली, शहर अध्यक्ष प्रवीण दटके, क्रीडा महोत्सवाचे संयोजक संदीप जोशी आदी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, राज्य सरकारने गेल्यावेळी मैदानाच्या विकासासाठी ५० कोटी दिले होते आणि त्यात काही मैदान दुरुस्त केले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शहरात तीनशे मैदान तयार करण्याची तयारी दर्शवली आहे त्यामुळे या नव्या मैदानासाठी आता राज्य सरकारकडून शंभर कोटी रुपये देऊ. गडकरी यांच्या नेतृत्वात या मैदानाचे डिजाईन तयार करण्यात यावे आणि पुढील खासदार महोत्सवात होणारे खेळ या नव्या मैदानात व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गडकरी यांच्या प्रयत्नामुळे खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळाल्याचे ते म्हणाले. धंतोली परिसरातील यशवंत स्टेडियमचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. शिवाय मानकापूर येथील स्टेडियम आधुनिक पद्धतीने तयार करण्यात येणार आहे. हॉकीसाठी अस्ट्रॉटॉप तयार करून आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करू, असेही फडणवीस म्हणाले.
हेही वाचा- राज्यातील ५२० हवालदार होणार पोलीस उपनिरीक्षक
नितीन गडकरी म्हणाले, शहरातील मैदानासाठी शंभर कोटी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्यास अधिक चांगले मैदान तयार करण्यात येईल. पुढील महिन्यात दिव्यांग पार्कचे भूमिपूजन केले जाणार असून अपंगासाठी मैदान तयार केले जातील. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप जोशी यांनी केलेे.
विजय मुनीश्वर यांना क्रीडा महर्षी पुरस्कार
खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपाच्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अर्जुन व द्रौणाचार्य पुरस्कार विजेचे विजय मुनीश्वर यांना क्रीडा महर्षी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याशिवाय प्रिया चावजी, सायली वाघमारे,प्राची राजू गोडबोले, फैजान पठाण, मोहनीश मेश्राम, श्रुती जोशी, छकुली सेलोकर, अंकुश घाटे, अभिषेक सेलोकर, प्रज्ज्वल पंचबुधे, जावेद अख्तर, हर्षा खडसे, ईशिता कापटा, घारा फाटे, जयेंद्र ढोले, नीलेश मत्ते, अनिल पांडे, आदी चिटणीस, निखिलेश तभाने, यश गुल्हाणे, सचिन पाटील, रोशनी प्रकाश रिंके, अंशिता मनोहरे यांना क्रीडा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
हेही वाचा- सरकार कोसळण्याच्या पटोलेंच्या दाव्यावर बावनकुळेंचे प्रत्युत्तर; म्हणाले, “आणखी २० आमदार…”
खेळाचे व्यसन करा
कुठलेही व्यसन करायचे असेल तर ते खेळाचे व्यसन करा, असे आवाहन माजी रेसलर ग्रेट खली यांनी केले. नागपूरकर भाग्यवान आहे की ज्यांना असे लोकप्रतिनिधी मिळाले. तुमच्या लोकांच्या प्रेमामुळे ग्रेट खली हा मला किताब मिळाला आहे. गडकरी आणि फडणवीस यांनी ठरवले तर खेळामध्ये महाराष्ट्र क्रमांक एक वर येऊ शकतो, असा विश्वास असल्याचे खली म्हणाला.