गावातील मुलीवर करण्यात आलेल्या बलात्कार प्रकरणी साक्षीदार असलेल्या एका व्यक्तीला आरोपीच्या भावाने साक्ष फिरवण्यासाठी दबाव टाकला. परंतु, साक्ष फिरवण्यास नकार दिल्यामुळे त्याचा गोळी घालून खून केला. ही थरारक घटना सोमवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास नरखेड तालुक्यातील बेलोना गावात घडली. केशवराव बाबुराव मस्के (५२, बेलोना, ता. नरखेड) असे खून झालेल्या साक्षीदाराचे नाव आहे. तर भरत रामचंद्र कळंबे (३०, बेलोना) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मस्के आणि कळंबे कुटुंबात जुना वाद आहे. मस्के हे शेती आणि दूधविक्रीचा व्यवसाय करतात. गेल्या तीन वर्षांपूर्वी आरोपी भरत कळंबे याचा मोठा भाऊ प्रेमराज कळंबे (३५) याने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. पीडितेवर बलात्कार करताना केशव मस्के याने बघितले होते.

पीडितेने पोलिसात तक्रार केली होती. याप्रकरणी पोलिसांनी पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करून प्रेमराज कळंबे याला अटक केली होती. त्या प्रकरणात पोलिसांनी केशव यांना साक्षीदार बनवले होते. सध्या प्रेमराज हा बलात्काराच्या गुन्ह्यात मध्यवर्ती कारागृहात आहे.

ते प्रकरण न्यायालयात सुरू असून केशव यांच्या साक्षीनंतर प्रेमराजला जवळपास १० वर्षांची शिक्षा होणार होती. त्यामुळे प्रेमराजचा भाऊ भरत कळंबे याने केशव यांना साक्ष फिरवण्यासाठी दबाव टाकला. त्याला साक्ष न फिरवल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. तरीही त्यांनी साक्ष फिरवण्यास नकार दिला होता. सोमवारी सायंकाळी केशव हे दूधविक्री करून घरी परत येत होते.

दरम्यान, बसस्थानकाजवळ असलेल्या उपसरपंच काळमेघ यांच्या शेताजवळ भरत कळंबे याने तीन साथीदारांच्या मदतीने केशव यांना अडवले. त्यांना साक्ष फिरवण्यास सांगितले. मात्र, त्यांनी नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या भरतने केशव यांच्या कानशिलावर बंदूक ठेवली आणि गोळी झाडून खून केला. याप्रकरणी नरखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

केशव यांचा खून केल्यानंतर आरोपी भरत कळंबे हा दुचाकीने पळून जात होता. परंतु, मस्के यांना खून करण्याची धमकी देणाऱ्या भरतने खून केल्याचे कळताच पोलिसांनी जिल्ह्यात प्रत्येक रस्त्यावर नाकाबंदी केली. मोवाडवरून जलालखेडाकडे जाणाऱ्या मार्गावर पोलिसांनी भरतला सापळा रचून अटक केली.

Story img Loader