नागपूर: जुना गोधनी नका चौक रोडवरील मानकापूर आठवडी बाजारात पाच युवकांची टोळी हातात पिस्तूल घेऊन आली. त्या टोळीतील एकाने “शाहरुख कहा है ?” असे एका दुकानदाराला विचारले. त्यानंतर त्या टोळीने बाजारात अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात एक जण ठार तर तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. ही घटना घडताच बाजारात गोंधळ उडाला आणि नागरिकांनी पळापळ केली. ही घटना गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. वृत्त लिहिपर्यंत मृत युवकाचे आणि जखमी युवकांचे नाव कळू शकले नाही. याप्रकरणी पोलिसांनी चार युवकांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास पाच जणांची टोळी मानकापूर आठवडी बाजारात आली. त्यांनी अनेकांना शिवीगाळ केली. काही दुकानदारांना मारहाण केली. त्यांच्या हातात शस्त्रे होती. काही वेळातच त्यांनी एका व्यक्तीवर गोळी झाडली ती छातीत शिरल्याने त्याचा मृत्यू झाला. सोहेल (३५)असे गोळी लागून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.