बुलढाणा : नाशिक येथून शेगाव येथे दर्शनासाठी जाणाऱ्या परिवाराची दर्शनाची मनोकामना अधुरीच राहिली. त्यांच्या भरवेगातील चारचाकी वाहनाचे टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात एका कुटुंबातील एकाचा मृत्यू झाला तर तिघेजण जखमी झाले.
बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी द्रुतगती महामार्गावर हा विचित्र अपघात झाला. नागपूर कॉरिडॉर वरील चॅनल क्रमांक २९१.६ नजीक सोमवारी (१६ डिसेंबर) रात्री साडे दहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. समृद्धी महामार्ग वरून नाशिक येथील खुळे पारिवार मारुती सुजूकी अल्टो (एम एच १५ ई एक्स ५१७४ क्रमाकाच्या ) वाहनाने शेगाव येथे दर्शनाला जात होते.
हेही वाचा…भंडारा : शिवसेना विभाग प्रमुखाला राष्ट्रवादीच्या नेत्याकडून शिवीगाळ
ह
रात्री उशिरा नागपूर कॅरिडोर चॅनेल नंबर २९१.६ या ठिकाणी वाहनाच्या उजव्या बाजूचे मागील टायर फुटल्याने भरधाव वेगाने जाणारे वाहन हे रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या बॅरिकेटला धडकले. यामध्ये वाहन चालक महेश खुळे (राहणार नाशिक) हे गंभीर तर त्यांच्याच परिवारातील सोबतचे ३ सदस्य जखमी झाले. यामध्ये शकुंतला खुळे (वय ६० वर्षे), दीपाली खुळे वय ३८ वर्षे) आणि धनश्री खुळे (वय १८ वर्षे) यांचा समावेश आहे.
हेही वाचा…बिबट्याची संख्या वाढली… आता नसबंदी हा एकच जालीम…
अपघाताची माहिती समृद्धी मार्गाच्या गस्तीवर असलेले सह पोलीस निरीक्षक संदीप इंगळे, मेजर खोडे, योगेश शेळके यांना मिळताच त्यांनी घटना स्थळ गाठले. त्यांनी तातडीने बचाव चमू व सुसज्ज रुग्णवाहिका पाचारण केली. गंभीर जखमी महेश खुळे आणि इतर तिघा जखमींना उपचारासाठी मेहकर (जि. बुलढाणा) येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, महेश खुळे यांचा उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. इतर जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय आणि पोलीस सूत्रांनी सांगितले.