लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यवतमाळ : खरिप हंगामातील पेरण्या पूर्ण होत आल्या असल्या तरी जिल्ह्यातील निम्म्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांना अद्यापही पीककर्ज मिळाले नाही. अजूनही एक लाख शेतकरी कर्ज प्रक्रियेच्या बाहेर असल्याने बँकांनी पीककर्ज वाटपाचे प्रमाण वाढवावे, अशी सक्त ताकीद जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी बँकर्स कमिटीच्या बैठकीत दिल्या.

पीककर्जासह शिक्षण, गृह तसेच विविध योजनांसाठीदेखील कर्जवाटपाचे बँकांना उद्दिष्ट देण्यात आले आहे. बँकांनी या उद्दिष्टाप्रमाणे काम करत अधिकाधिक कर्ज वाटप करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

आणखी वाचा-वर्धा : दानदाता व्यथित; आरोप झाल्याने दान दिलेली ४० एकर जमीन परत मागितली…

महसूल भवनामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बँकर्स समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीला भारतीय रिझर्व्ह बँकेचे मॅनेजर सर्वज्ञ सिंग, जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक अमर गजभिये, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी दीपक पेंदाम, बँक ऑफ इंडियाचे रिजनल मॅनेजर कौस्तुभ चक्रवर्ती, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, आत्माचे प्रकल्प संचालक संतोष डाबरे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त विजय रहाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी क्रांती काटोले आदी उपस्थित होते.

गैरप्राधान्य क्षेत्रासाठी ५१ हजार ६०० खातेधारकांना एक हजार ५०० कोटींच्या कर्ज वाटपाचा समावेश आहे. बँकांना वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्याप्रमाणे कर्जवाटपाच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी बँकनिहाय कर्ज वाटपाचा आढावा घेतला. जिल्ह्याला २ हजार २२० कोटी रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दष्ट होते. आतापर्यत १ लाख ९६ हजार शेतकऱ्यांना १ हजार २३५ कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप झाले. ज्या बँकांनी चांगले कर्जवाटप केले. त्यांचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुकही केले.

आणखी वाचा-चिंताजनक! गडचिरोलीत सहा महिन्यात हिवतापामुळे ५ मृत्यू

बँकाना कृषी क्षेत्रासह इतर क्षेत्रातही कर्ज वाटपाचे उद्दि्ट आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. याशिवाय शेती उपयोगी कामांसाठी कर्ज, उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज, गृहकर्ज, उद्योग, व्यवसाय, रोजगार, उभारणीकरिता कर्ज दिले जाते. याचाही बँकनिहाय आढावा घेतला. जिल्हा अग्रणी बँकेने सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाकरिता जिल्ह्यासाठी जिल्हा ऋण योजना तयार केली. या योजनेच्या आराखड्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते यावेळी प्रकाशन करण्यात आले. यावर्षीचा जिल्हा ऋण आराखडा ७ हजार २५ कोटींचा आहे. त्यात प्राधान्यक्षेत्रात ३ लाख ८९ हजार ७५ खातेदारांना ५ हजार ५२५ कोटींचे वाटप प्रस्तावित आहे. पीक कर्जापासून वंचित शेतकऱ्यांना जिल्हाधकाऱ्यांच्या सूचनेनंतर कर्ज मिळेल, ही अपेक्षा व्यक्त होत आहे.

पाऊस अनियमित

जिल्ह्यात यावेळी पाऊस विलंबाने दाखल झाला. पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी पेरण्या पुढे ढकलल्या. दोन आठवड्यापासून जिल्ह्यात सर्वत्र पाऊस कोसळत आहे. मात्र तो अनियमित असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पुसद, उमरखेडसह काही तालुक्यांत अतिवृष्टी तर वणी परिसरात पावसाचे प्रमाण कमी आहे. पावसाच्या असमतोलामुळे पिकांच्या वाढीवर आणि उत्पन्नावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One lakh farmers out of loan process nrp 78 mrj
Show comments