अकोला : अयोध्या येथील राम मंदिरात प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अकोला शहर व जिल्हा राममय झाला आहे. शहरातील मंदिरे व प्रमुख चौक भगवामय झाले आहेत. बिर्ला राममंदिर येथे नीलेश देव मित्र मंडळाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात तीन हजार महिला व एक हजार विद्यार्थिनींकडून एक लक्ष वेळा रामरक्षा पठण करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अयोध्या येथील राम मंदिरात प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अकोला शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील बिर्ला राम मंदिरात तीन हजारावर महिला आणि एक हजार शाळकरी विद्यार्थिनींनी अत्यंत लयबद्ध सादरीकरणातून एक लाख वेळा रामरक्षा पठण केले. गेल्या काही दिवसांपासून या सोहळ्याची तयारी करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, संस्कृती संवर्धन समितीचे अध्यक्ष डॉ. राजकुमार हेडा, आयोजक नीलेश देव, नरेश बजाज आदींसह आयोजन समितीचे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. शिस्तबद्धरित्या महिलांनी रामरक्षा पठण सोहळ्यात सहभाग घेतला. या सोहळ्यात सहभागी महिलांना किटचे वाटप केले. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी पोलिसांकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. रामरक्षा पठणानंतर हजारो राम भक्तांना महाप्रसादाचे वितरण केले, अशी माहिती ॲड. धनश्री देव सेवा स्मृती प्रकल्पाद्वारे देण्यात आली.

हेही वाचा – नागपुरात घरोघरी भगवे ध्वज, रांगोळ्या, तोरण अन् मिरवणुकांमध्ये ‘जय श्री राम’चा गजर

जिल्ह्यातील सर्वच मंदिरांमध्ये भजन, कीर्तन, नामस्मरण, हनुमान चालिसा पाठ, सुंदर कांड करून महाप्रसादाचे कार्यक्रम घेण्यात येत आहेत. घर, मंदिरांवर ध्वज लावण्यात आले आहेत. चौका-चौकांमध्ये भगव्या पतका लावण्यात आल्या आहेत. आयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर शहरात ठिकठिकाणी जोरदार आतषबाजी करण्यात आली. जिल्ह्यातील २५ हजार मंदिरांवर रोषणाई करण्यात आल्याची माहिती आमदार रणधीर सावरकर यांनी दिली.

हेही वाचा – वर्धेच्या महात्मा गांधी हिंदी विद्यापीठात सुंदरकांड, दीपोत्सव, परिसंवाद आणि बरेच काही…

३३१ किलोचा लाडू

श्री जानकी वल्लभ सरकार धर्मात संस्था व स्व.अरुण जिरापुरे प्रेरणा प्रतिष्ठानच्यावतीने मोठ्या राम मंदिरासमोर २५१ किलोचा नैवेद्य रामप्रसाद लाडूचा संकल्प पूर्ण होऊन ३३१ किलोचा लाडू तयार करण्यात आला आहे. प्रसादाचे वितरण भाविकांना करण्यात येत असल्याची माहिती भाजपचे प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी यांनी दिली.