नागपूर : एक संघटना, एक पक्ष, एक संस्था किंवा एक नेता यांच्यामुळेच समाजात परिवर्तन होत नाही. परिवर्तन तेव्हा होते, जेव्हा सामान्य माणूस त्या परिवर्तनाकरिता पुढाकार घेतो, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षांच्या निमित्ताने विदर्भ साहित्य संघ, ग्रंथालयाच्यावतीने वर्षभर राबवण्यात आलेल्या ‘संस्थांची शतकोत्तर आव्हाने’ या व्याख्यानमालेचा समारोप मंगळवारी झाला. त्यावेळी भागवत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकोत्तर आव्हानांवर प्रकाश टाकला.
डॉ. भागवत म्हणाले, कितीही मोठा असला तरी देशातील सगळय़ा आव्हानांचा सामना एक नेता करू शकत नाही, असे संघाचे मत आहे. हे सांगताना त्यांनी १८५७ च्या उठावाचा दाखला दिला. ते म्हणाले, १८५७ पासून भारताचा स्वातंत्र्य लढा सुरू झाला. पण सामान्य माणूस जेव्हा रस्त्यावर उतरला तेव्हाच हा लढा यशस्वी झाला, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
..तर लोक संघालाही देश चालवायचा ठेका देतील
देशावर वेगवेगळय़ा परकीय शासकांनी अनेक वर्षे राज्य केले. त्यामुळे समाजात परावलंबत्वाची भावना अजूनही कायम आहे. त्यामुळे जनता देशाचे भले करण्याचा ठेका कधी या तर कधी त्या ठेकदाराला देत असते. संघ लोकप्रिय झाल्यास लोक देश चालवण्याचा ठेका संघालाही देतील, पण संघ तो ठेका घेणार नाही. समाजाने विविध आव्हानांचा सामना करण्यासाठी सरकार, संस्था वा संघावर अवलंबून न राहता स्वावलंबी झाले पाहिजे, असेही डॉ. भागवत म्हणाले.