चंद्रपूर जिल्ह्यात रविवारी दोन बिबट्यांचा मृत्यू झाला. सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील कन्हाळगाव येथे दोन बिबट्यांमधील वर्चस्वाच्या लढाईत एका तीन वर्षीय नर बिबट्याचा मृत्यू झाला, तर चंद्रपूर – बल्लारपूर मार्गावर भिवकुंड नाक्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला.
हेही वाचा- वैदर्भीय बेरोजगारांची फरफट; ४१३२ बेरोजगारांची नोंदणी, मात्र, नोकरी ३४७ जणांना
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पालगतच्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रात वाघ आणि बिबट विरुद्ध मानव संघर्ष सुरू असतानाच जंगलातील वास्तव्यासाठी दोन बिबट्यांमधील अस्तित्वाच्या लढाईमध्ये एका बिबट्याने दुसऱ्या तीन वर्षीय नर बिबटला ठार केले. दुसऱ्या घटनेत, भिवकुंड नाक्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला. बिबट्याला धडक दिल्यानंतर वाहनचालक पसार झाला आहे. वन खाते वाहनाचा शोध घेत आहे.
ही घटना रविवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली. त्यावेळी या रस्त्यावर सर्वत्र अंधार होता. वन अधिकाऱ्यांना माहिती मिळताच संपूर्ण पथक घटनास्थळी पोहचले. बिबट्याचा मृतदेह रस्त्यावर पडून असल्यामुळे वाहतूक काही काळासाठी खोळंबली होती. दरम्यान, बिबट्याला धडक देणारे वाहन चारचाकी असावे, असा अंदाज आहे.