वर्धा : सेलू बाजार समितीत भाजपचे खासदार रामदास तडस व आमदार डॉ.पंकज भाेयर तसेच समीर कुणावार यांनी शड्डू ठोकून निवडणूकीत उडी घेतली होती. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख, काँग्रेसचे शेखर शेंडे व शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देवतारे यांनी संयुक्त लढा दिला.
काँग्रेसचेच आमदार असलेले रणजीत कांबळे यांनी आघाडीला साथ न देता त्यांच्या जयस्वाल गटाला भाजपच्या पंगतीत बसवले. त्यामुळे ही लढाई फार निकराची झाली होती. हा भाग भाजप आमदार भोयर यांच्यासाेबतच समीर कुणावार यांच्याही क्षेत्रात मोडतो. एक खासदार, तीन आमदार विरोधात सत्तेत नसलेले आघडीचे नेते अश्या लढाईत आमदारबहुल पॅनलला धारातीर्थी पडावे लागले आहे.
या बाजार समितीत पैशांचा महापूर आल्याची चर्चा आहे. तसेच काँग्रेसचे शेखर शेंडे व आ.कांबळे यांच्या पक्षांतर्गत निकराच्या गटबाजीचा पैलू होता. आज सकाळी तर भाजपचे आ.भोयर व काँग्रेसचे आ.कांबळे यांनी सोबत बसूनच मतदानावर नजर ठेवली होती. मात्र, शेखर शेंडे अंजिक्य ठरले. केवळ समीर कुणावार गटाने कशाबशा दोन जागा जिंकत लाज राखली.