नागपूर : नरेंद्र मोदी सरकारने ‘एक देश, एक निवडणूक’चा नारा दिला आहे. त्यासाठी केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समितीही स्थापन केली आहे. लवकरच संसदेचे अधिवेशनही बोलावण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांमध्ये ‘एक देश, एक निवडणूक’बाबत कुतूहल निर्माण झाले आहे. ‘वन नेशन, वन इलेक्शन’ म्हणजे नेमके काय आणि भारतात अशी निवडणूक याआधीही झाली आहे का, तसेच जगात कोणत्या देशात अशी निवडणूक प्रक्रिया होते, याबाबतचा हा आढावा.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झालेल्या पहिल्यांदा १९५१ मध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र झाल्या. त्यानंतर १९५७, १९६१ आणि १९६७ मध्येही लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र झाल्या. १९६८ आणि १९६९ मध्ये अनेक राज्यांतील विधानसभा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी भंग झाल्या. १९७० मध्ये लोकसभा भंग झाली. त्यामुळे एकत्र निवडणुकांची प्रथा बंद झाली. १९९९ मध्ये लॉ कमिशनने एकत्र निवडणुकांची शिफारस केली होती. त्यानंतर २०१५ मध्ये संसदीय समितीने असाच सल्ला दिला. नंतर ऑगस्ट २०१८ मध्ये लॉ कमिशनने सध्याच्या संविधानिक रचनेत एकत्र निवडणुका होऊ शकत नसल्याचे म्हटले. काही संविधानिक बदल त्यासाठी करावा लागेल असे म्हटले जात आहेत.
हेही वाचा – धक्कादायक! ‘त्या’ बालिकेच्या शरीवाढीसाठी देत होते ‘हार्मोन्स’चे इंजेक्शन
आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच ‘एक देश-एक निवडणूक’ चा आग्रह धरला आहे. गेल्या महिन्यात राज्यसभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी एक देश-एक निवडणूक ही काळाची गरज असल्याचे म्हटले होते. देशात आता एक देश-एक निवडणूक या निर्णयावर चर्चा होत असली तरी जगात अनेक देश असे आहेत जेथे आधीपासून एक देश एक निवडणूक होत असते.
हेही वाचा – नागपूर : प्रेमसंबंधातून अल्पवयीन युवती गर्भवती, प्रियकरावर बलात्काराचा गुन्हा
जगात अनेक देशांत एकत्र निवडणुका होतात. दक्षिण आफ्रिकेतील संसद, प्रांतीय विधानसभा आणि पालिकांच्या निवडणुका एकत्र होतात. येथे दर पाच वर्षांनी निवडणुका होतात. स्वीडनमध्येही एकत्र निवडणुका होतात. येथे दर चार वर्षांनी सार्वजनिक निवडणुकांबरोबर काऊंटी आणि म्युनिसिपल काऊंन्सिलच्या निवडणुका होतात. बेल्जियममध्ये पाच प्रकारच्या निवडणुका होतात. येथे पाच वर्षांनी एकत्र निवडणुका होतात. ब्रिटनमध्ये हाऊस ऑफ कॉमन्स, स्थानिक निवडणुका आणि महापौर निवडणूक एकत्र होते. इंडोनेशियात राष्ट्रपती आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र होतात. तसेच जर्मनी, फिलिपाईन्स, ब्राझील, बोलिविया, कोलंबिया, कोस्टा रिका, ग्वाटेमाला, गुआना, होंडुरस येथेही एकाच वेळी निवडणुका होतात.