महेश बोकडे, लोकसत्ता
नागपूर : २०२२-२३ मधील आकडेवारीनुसार, राज्यात प्रत्येक ३९ मिनटाला एक नवजाताचा मृत्यू झाला आहे. नागपूर, पुणे, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात अशा मृत्यूंचे प्रमाण जास्त आहे.
माहिती अधिकारांतर्गत आरोग्य विभागाच्या पुणे कार्यालयातून मिळालेल्या आकडेवारीनुसार, राज्यात २०१९-२० मध्ये १४ हजार ६१४ नवजातांचे मृत्यू झाले. २०२०-२१ मध्ये १३ हजार ९५९ इतके नवजातांचे मृत्यू झाले. २०२१-२२ मध्ये हे मृत्यू वाढून १४ हजार २९६ वर पोहचले. २०२२-२३ मध्ये राज्यात १३ हजार ६५३ मृत्यू नोंदवले गेले. २०२२-२३ मधील नवजातांची मृत्यूसंख्या बघता राज्यात दिवसाला ३१.३५ तर प्रत्येक ३९ मिनिटाला एकाचा मृत्यू नोंदवला जात असल्याचेही, माहितीच्या अधिकारातून सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी पुढे आणले आहे. कोलारकर यांनी नागपूर, पुणे, अमरावती, अकोला, यवतमाळ या पाच जिल्ह्यांचीही स्वतंत्र माहिती मागितली होती. त्यानुसार, २०२१-२२ या वर्षाच्या तुलनेत २०२२- २३ मध्ये नागपूर, पुणे, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये नवजातांचे मृत्यू वाढल्याचेही पुढे आले आहे.
आणखी वाचा-‘मेडिकल’च्या वसतिगृहात रॅगिंग? रात्री विद्यार्थ्यांना…
डॉक्टरांचा नियमित सल्ला आवश्यक
गर्भातच बाळाच्या मृत्यूला आई आणि बाळाशी संबंधित विविध कारणे असू शकतात. आईला आजाराने उद्भवणारी गुंतागुंत, बाळाला गर्भात योग्य रक्त व प्राणवायूचा पुरवठा न होणे, विविध संक्रमण, आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचण्यास विलंब, अशी ही कारणे आहेत. अशा स्थितीत नियमित डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे, असे मत भारतीय वंध्यत्व सोसायटीच्या विदर्भ शाखेच्या प्रमुख डॉ. सुषमा देशमुख यांनी व्यक्त केले.
इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात नवजातांचे मृत्यू कमी आहेत. शासनाच्या प्रयत्नाने २०२१-२२ च्या तुलनेत २०२२- २३ मध्ये हे प्रमाण कमीही झाले. ही संख्या आणखी खाली आणण्यासाठी प्रभावी उपाय सुरू आहेत. -डॉ. नितीन अंबाडेकर, सहसंचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग, पुणे.
कुंडलीऐवजी जनुकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या
नवजातांचे मृत्यू टाळण्यासाठी लग्नादरम्यान कुंडली ऐवजी जनुकीय तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. जवळच्या नात्यात लग्नामुळे जनुकीय आजार संभवत असल्याने तसे करणे टाळा. गावठी औषध घेऊ नका. शासकीय वा खासगी रुग्णालयातच प्रसूती करा, शासनाने सरकारी रुग्णालयांत महागड्या जनुकीय चाचणी व ‘ॲन्यूमली स्कॅन’ची सोय केली तर मोठ्या प्रमाणात मृत्यू टाळणे शक्य आहे, असे मत बालरोग तज्ज्ञांच्या राज्य संघटनेचे माजी कार्यकारी सदस्य डॉ. पंकज अग्रवाल यांनी व्यक्त केले.
आणखी वाचा-वाशीम: वीज पडून महिलेचा मृत्यू, चार जनावरेही दगावली
नवजातांच्या मृत्यूची स्थिती, स्त्रोत- एचएमआयएस (सार्वजनिक आरोग्य विभाग)
वर्ष- नागपूर- पुणे- अमरावती- अकोला- यवतमाळ
२०१९-२०- ७०८- ८९८- ६८३- ५४९- १८३
२०२०-२१- ५९०- ७७८- ६४८- ४६४- ८९
२०२१-२२- ४६७- १०१३- ५८४- ५५०- ७२
२०२२-२३- ५६०- ११५६- ६२६- ५१०- ६८
एकूण- २३२५- ३८४५- २५४१- २०७३- ४१२