नागपूर : रामटेक गडमंदिरातून दर्शन आटोपल्यानंतर परत येणाऱ्या कुटुबियांची कार रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकला धडकली. या अपघातात कारमधील चिमुकल्यासह मुलगी व वृद्धाचा मृत्यू झाला. दोन कुटुंबांतील सहाजण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये दोन लहान मुलींचा समावेश आहे. ही घटना रामटेक-भंडारा मार्गावरील खंडाळा शिवारात रविवारी दुपारी तीन वाजता घडली.
परसराम लहानू भेंडारकर (७०), त्यांचा नातू हिमांशू राजेश भेंडारकर (८ महिने) व भार्गवी चंद्रहास बोंदरे (८ वर्षे) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. जखमींमध्ये पत्नी सीताबाई परसराम भेंडारकर (६४), मुलगा राजेश परसराम भेंडारकर (३४), सून दुर्गा राजेश भेंडारकर (३२), नात उन्नती राजेश भेंडारकर (५), मेघा चंद्रहास बोंदरे (३१), भाव्या चंद्रहास बोंदरे (८), सर्व रा. सोनकापाळसगाव, ता. साकोली, जिल्हा भंडारा यांचा समावेश आहे.
हेही वाचा – भंडारा : जीर्ण शाळेच्या स्लॅबचा भाग कोसळला; सुदैवाने मुले बचावली
भेंडारकर व बोंदरे यांची कौटुंबिक मैत्री असून, दोन्ही कुटुंबातील एकूण नऊजण रामटेक परिसरात रविवारी सकाळी फिरायला आले होते. त्यांनी गडमंदिरात दर्शन घेतल्यानंतर (एमएच-३६/ एच-८४०३) क्रमांकाच्या कारने परत निघाले होते. खंडाळा शिवारात पोहोचताच चालक राजेशचे कारवरील नियंत्रण सुटले आणि वेगात असलेली कार रोडलगत उभ्या आलेल्या (एमएच-४० / सीडी- ९८०२) क्रमांकाच्या ट्रकवर मागून आदळली. यात परसराम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अन्य आठजण गंभीर जखमी झाले.
हेही वाचा – राज्यात सर्वाधिक हत्याकांड मुंबई-पुण्यात; ठाणे-नागपुरात खुनाच्या घटनांवर नियंत्रण
अरोली पोलिसांनी घटनास्थळ गाठून मदतकार्य सुरू केले. परसराम यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. जखमींवर रामटेकमधील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होता. पुढील उपचारासाठी सर्व जखमींना नागपूरला आणण्यात आले. हिमांशू व भार्गवी या दोघांचा नागपुरातील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी अरोली पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.