बुलढाणा: समृद्धी महामार्गावर आज मंगळवारी दुपारी झालेल्या अपघातात चार प्रवासी जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील असलेल्या जखमींना उपचारासाठी जालना येथे भरती करण्यात आले.
प्राथमिक माहितीनुसार ‘समृद्धी’वरील नागपूर काॅरिडोर वर सिंदखेडराजा नजीक चॅनेल क्रमांक ३३५ वर हा अपघात घडला. भरधाव कार (एम एच ०५ डीए १९२७) ही नागपूर येथून नाशिककडे जात होती. नेल ३३५ नजीक ही भरधाव कार अनियंत्रित झाल्याने दुभाजकाला धडकली. यात वाहनातील पाच प्रवासी जखमी झाले. त्यांना सिंदखेडराजा व दुसरबीड येथील रुग्णवाहिकाद्वारे जालना येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील एका प्रकृती खालावलेल्या जखमीचा मृत्यू झाला आहे.