बुलढाणा: मध्यप्रदेश परिवहन महामंडळाची बस व दुचाकीमध्ये झालेल्या धडकेत एक इसम जागीच दगावला तर दोघे जण गंभीर जखमी झाले. नांदुरा नजीकच्या डागा पेट्रोल पंप नजीक आज २२ ऑगस्ट रोजी ही दुर्घटना घडली. दोघा जखमींवर पिंप्री गवळी ता. खामगाव येथे उपचार सुरू आहे.
‘एमपी’ परिवहन महामंडळाची (एमपी-६८-पी-०२४६ क्रमांकाची) बस आज नांदुरा कडून खामगाव कडे जात होती. ही बस आणि खामगाव कडून नांदुरा जाणाऱ्या स्कुटी ची (एमच-२८-बीटी-७११६) समोरासमोर धडक झाली. अपघाताची माहिती मिळताच मलकापूरचे आमदार राजेश एकडे यांनी ओम साई फाउंडेशनची रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना केली.
हेही वाचा… गोंदिया जिल्ह्यातील रूग्णवाहिका चालकांवर उपासमारीची वेळ; १८ महिन्यांपासून मानधन थकले
फाउंडेशनचे स्वयंसेवक विलास निंबोळकर, आनंद वावगे, राजू बगाडे , वैभव सनिसे, अभिषेक जैन, पोलीस जमादार सुनील सुशिर हे रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्तांवर प्रथम नांदुरा येथे उपचार करण्यात आले. मात्र दुर्दैवाने नागेश डोंगरे (रा.पिंपरी गवळी, तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा) याचा मृत्यू झाला. त्याचे सहकारी राजेंद्र उर्फ प्रवीण इंगळे व विशाल बर्डे (दोन्ही राहणार रा. पिंपरी गवळी) यांना फाउंडेशन च्या रुग्णवाहिकेने पुढील उपचारासाठी खामगांव येथे दाखल करण्यात आले आहे.