यवतमाळ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येकाला बाबासाहेबांबद्दल व्यक्त होताना काहीतरी वेगळे करायचे आहे.  आज अनेकांनी बाबासाहेबांना आपापल्या पद्धतीने अभिवादन केले. मात्र येथील ‘ब्ल्यूशाईन ग्रुप’ ने दिलेली मानवंदना आगळीवेगळी ठरली. वाचन, नृत्य, नाटिका अशा चौफेर कार्यक्रमाचे आयोजन करून १५ ते ७० वयोगटातील एक हजार महिलांनी बाबासाहेबांना अनोखी मानवंदना दिली.ब्ल्यूशाईन सांस्कृतिक उपक्रमांतर्गत स्थानिक संविधान चौकात आयोजित कार्यक्रमात संविधान वाचन, भीम गर्जना आणि भीम गीतांवर आधारित सामूहिक नृत्य सादर करण्यात आले. या नृत्याद्वारे महामानवाला मानवंदना अर्पण करण्यात आली. यामध्ये १५ ते ७० वयोगटातील सुमारे एक  हजार महिलांनी सहभाग घेतला. विविध वयोगटातील महिलांचा एकत्र सहभाग हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.यावर्षी प्रथमच ‘ब्ल्यूशाईन ग्रुप’च्या वतीने ‘सावित्रीच्या लेकी’ ही नाटिका देखील सादर करण्यात आली.

 नाटिकेची लेखिका शुभांगी लिहितकर यांनी आपल्या चमूसह ही कलाकृती प्रभावीपणे सादर केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महिलांसह पुरुष मंडळींचाही मोठा सहभाग लाभला. हजारोंच्या संख्येने रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहून या महिलांच्या कार्यक्रमास दाद दिली.ब्ल्यूशाईन ग्रुप च्या संचालिका विजया भगत, श्रद्धा कांबळे, अश्विनी दिघाडे, बिना भगत, शुभांगी लिहितकर, प्रीती फुलकर, भाविका मुनेश्वर, वर्षा तामगाडगे, चेतना पाटील, रितू डोंगरे, आकांक्षा शिवणकर, तन्वी मेश्राम, खुशी मेश्राम, संगीता बोरकर, आरती गवई, प्रीती बोरकर, मनोरमा मडके, संजय गुजर, मंगेश भगत, रवी राऊत, रामभाऊ धोंगडे, रोशन भितकर, सूरज बागडे, शंतनु देशभ्रतार आणि ब्ल्यूशाईन ग्रुप यांनी या कार्यक्रमासाठी अनेक दिवसांपासून तयारी केली होती. महिला एकत्र आल्या, तर केवळ कार्यक्रम नव्हे तर चळवळी घडतात. आजच्या सामूहिक मानवंदनेतून आम्ही केवळ बाबासाहेबांना आदरांजली अर्पण केली नाही, तर पुढच्या पिढीसाठी विचारांचं बीजही पेरलं आहे, अशी प्रतिक्रिया ब्ल्यूशाईन ग्रुपच्या विजया भगत यांनी दिली.

दरम्यान, येथील भीम गर्जना ढोल ताशा व ध्वज पथक यवतमाळ तर्फे बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली. स्थानिक संविधान चौकात आज पहाटेपासूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी शेकडो महिला, पुरुषांनी गर्दी केली.  गर्दीमुळे बसस्थानक चौकातील वाहतूक इतरत्र वळवली आहे. विविध राजकीय, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, नागरिकांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. या ठिकाणी प्रबोधनपर आणि सांस्कृतिक कार्यक्रम झाले, तसेच पुस्तक विक्री मोठ्या प्रमाणात झाली.