नागपूर: सरकारकडून समृद्धी महामार्गाचे खूप कौतुक होत असले तरी १८ ऑक्टोबर २०२३ पर्यंतची स्थिती बघितली तर प्रत्येक दोन दिवसांमध्ये येथे एकाचा अपघाती मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. समृद्धीवरील सर्वाधिक बळी बुलढाणा जिल्ह्यात गेले आहेत. सुरुवातीपासूनच येथे अपघातांची मालिका सुरू आहे. ११ डिसेंबर २२ ते १८ ऑक्टोबर २३ अशा ३१२ दिवसांत नऊशेच्या जवळपास अपघात झाले.
परिवहन खात्याच्या अहवालानुसार, या महामार्गावर एकूण ७९ प्राणांकित अपघातात १५६ नागरिकांचा मृत्यू झाला. सर्वाधिक ५६ मृत्यू बुलढाणा जिल्ह्यात झाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३२ मृत्यू, अमरावती जिल्ह्यात १६, वाशीममध्ये १४, वर्धा ११, जालना १०, नाशिक ९, श्रीरामपूरमध्ये ८ मृत्यू नोंदवले गेले. या अपघात व मृत्यूसंख्येबाबत विचारणा करण्यासाठी परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्याशी भ्रमनध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. दुसऱ्या एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर अपघात व मृत्यूसंख्येला दुजोरा दिला.
हेही वाचा – “मी फिरते मळ्यात…”, अमृता फडणवीसांनी देवेंद्र फडणवीसांसाठी घेतला खास उखाणा
हेही वाचा – चंद्रपूर जिल्हा बँकेतील ३६० पदांची नोकर भरती टीसीएस कंपनीच्या माध्यमातून होणार
रात्रीच्या अपघातात सर्वाधिक मृत्यू
परिवहन खात्याच्या अहवालात, पहाटे ६ ते सायंकाळी ६ आणि संध्याकाळी ६ ते दुसऱ्या दिवशी पहाटे ६ अशा प्रत्येकी १२ तासांचा अभ्यास आहे. त्यानुसार ११ डिसेंबर २०२२ ते १८ ऑक्टोबर २०२३ दरम्यान या महामार्गावर सकाळी ३६ आणि रात्री ४३ असे एकूण ७९ प्राणांकित अपघात झाले. येथे ४२ अपघात एकेरी वाहनांचे तर दोन वा अधिक वाहनांमुळे ३७ अपघात झाले.