अमरावती : विदर्भाचे नंदनवन असणाऱ्या चिखलदरा येथे पावसाळी पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते.शनिवारी व रविवारी पर्यटकांची तेथे गर्दी असते. ही बाब लक्षात घेऊन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी चिखलदरा पर्यटनस्थळी जाण्याकरिता जुलै ते सप्टेंबर या दरम्यान प्रत्येक शनिवारी व रविवारी वाहतूक एक मार्गी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.त्यामुळे पर्यटकांना चिखलदऱ्याला जाण्यासाठी धामणगाव, मडकी, मोथा मार्गे, तर परत येताना सलोना, घटांग मार्गे यावे लागणार आहे.
जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यात, तर शनिवारी-रविवारी व सुटीच्या दिवशी चिखलदरा येथे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होण्यासह अपघाताच्या घटना घडतात.१५ जुलै रोजी चिखलदरा पर्यटन महोत्सवा दरम्यान भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाला होता. त्यामुळे वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याकरिता ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या प्रस्तावाला अनुसरून अप्पर जिल्हाधिकारी विवेक घोडके यांनी आदेश निर्गमित करत तीन महिन्यांसाठी शनिवार व रविवार या दिवशी एकमार्गी वाहतूक करण्याचे निर्देश दिले आहेत.