चंद्रपूर: कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरातील सावित्रीबाई फुले महाविद्यालयाच्या मागे, एक तरूणांचा मृतावस्थेत व एक तरूण बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याने गडंचादूर परिसरात खळबळ उडाली आहे. प्रज्वल नवले (२१) असे मृतकाचे तर नागेश लांडगे (२०) असे बेशुध्द असलेल्या युवकांचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही तरुण मित्र होते. प्रभाग क्रमांक ३ येथील रहिवासी प्रज्वल नवले व गडचांदूर येथील प्रभाग क्रमांक ६ येथील रहिवासी नागेश लांडगे दोघांनीही विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा तयार केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, प्रेमप्रकरणातून हा प्रकार झाल्याचे परिसरात बोलले जात आहे. बेशुद्ध अवस्थेतील तरुणाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो शुद्धीवर आल्यानंतर आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच घटनेचे सत्य समोर येईल.
ही घटना आत्महत्या आहे की खून, यावर चर्चा सुरू आहे. गडचांदूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. पोलीस स्टेशन प्रभारी शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.