अकोला : सरकारी धोरणामुळे कांद्याचे भाव पडल्याचा आरोप करून शेतकरी संघटने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे कांद्याची होळी पेटवली. ‘सरकार समस्या काय सोडवणार, सरकारच एक समस्या’ अशा घोषणा देऊन शेतकरी संघटनेने निषेध केला.
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध म्हणून शेतकरी संघटनेच्यावतीने आज होळीच्या दिवशी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कांद्याची होळी करण्यात आली. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाचे भाव वाढवण्याऐवजी भाव पाडण्याची मोहीमच केंद्र सरकारकडून राबवली जात आहे. त्याचाच फटका आज कांद्याला व इतर शेत मालाला बसला आहे. सरकारचे निर्यात धोरण याला कारणीभूत आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या मनमानी कारभारामुळे देशाने निर्यातीच्या बाबतीत पत गमावली. आता निर्यात खुली असली तरी कोणताही देश आपल्या देशावर विश्वास ठेवायला तयार नाही, त्याचा मोठा फटका देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला.
हेही वाचा >>> ठाकरे गटाकडून सांगलीत विधानसभा विजयाचे लक्ष्य, मात्र संघटना बांधणीचे काय?
कांदा माती मोल भावात विक्री करावा लागत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या मुला मुलींचे लग्न मोडलीत, मुलांचे शिक्षणे अर्ध्यावर सोडावी लागली आहेत. हे सर्व सरकारच्या चुकीच्या धोरणांचे परिणाम असल्याने शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली. सरकार विरोधात जोरदार घोषणा देऊन कांद्याची होळी करण्यात आली. यावेळी शेतकरी संघटनेचे विलास ताथोड, अविनाश नाकट, डॉ. निलेश पाटील, बळीराम पांडव, शंकर कवर, अजय गावंडे, सतीश उंबरकर, मयूर जोशी, योगेश थोरात आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.