अमरावती : गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. अमरावती कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या फळ आणि भाजीपाला बाजारात आठवडाभरात कांद्याचे प्रतिक्विंटल भाव १ हजार रुपयांनी वाढले आहेत. दररोज आवक कमी-कमी होत असल्यामुळे ही दरवाढ होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव वाढल्याने किरकोळ बाजारातही कांद्याचे भाव जवळपास दुप्पट वाढले आहेत. दोन, तीन दिवसांपूर्वीच किरकोळ बाजारात एक किलो कांदा ३० ते ४० रुपयांपर्यंत मिळत होता. मात्र, आता एक किलो कांद्यासाठी ग्राहकाला ७० ते ७५ रुपये मोजावे लागत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा – प्रतियुती असल्याने गुरू येणार पृथ्वीच्या सर्वांत जवळ, कधी आणि कसे पाहता येणार? जाणून घ्या…

अमरावती बाजार समितीत २१ ऑक्‍टोबरला ४०८ क्विंटल कांद्याची आवक झाली. सरासरी ३ हजार रुपये क्विंटल दर मिळाला. २७ ऑक्‍टोबरला केवळ ३३९ क्विंटल आवक झाली. सरासरी ४ हजार रुपये क्विंटल दर मिळाला. सात दिवसांत कांद्याचे दर हजार रुपयांनी वाढले. किरकोळ बाजारात मात्र ते दुपटीहून अधिक वाढले.

एकीकडे उन्हाळ कांदा संपत असताना दुसरीकडे लाल कांदा हळूहळू बाजारपेठेमध्ये दाखल होत आहे. शनिवारी फक्त एका वाहनातून लाल कांदा बाजार समितीत आला होता. त्यामुळे कांद्याचे भाव आता चढेच राहतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. बाजार समितीत विदर्भातील पांढऱ्या कांद्याची आवक अत्‍यल्प असल्‍याचे व्‍यापाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा – वाशिम : लोकप्रतिनिधींचे प्रयत्न निष्फळ; अखेर पाटबंधारे मंडळ कार्यालयाचे शेगावात स्थानांतरण, उद्घाटनही आटोपले…

दक्षिण भारतात कांद्याची वाढलेली मागणी व कांदा आवकमध्ये झालेली घट याचा परिणाम दरावर झाल्याची माहिती बाजारातील व्यापाऱ्यांनी दिली आहे. अनेक शेतकऱ्यांकडील कांद्याचा साठा संपुष्टात आला आहे. अशा परिस्थितीत दरवर्षीच्या तुलनेत होणारी खरीप कांद्याची आवक अद्याप सुरू नाही. त्यामुळे पुरवठ्यावर दबाव असल्याने कांदा दरात वाढ झाली. दक्षिण भारतात पाऊसमान कमी असल्याने आंध्र व कर्नाटक राज्यात खरीप कांद्याची लागवड तुलनेत कमी झाली. गुजरात, मध्य प्रदेशातील खरीप आवक होण्यास तीन आठवडे अवकाश आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Onion price doubled in three days know the retail market price mma 73 ssb