राजेश्वर ठाकरे
गॅस एजन्सी कार्यालयासमोरचे चित्र
ऑनलाईन किंवा मोबाईलद्वारे स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची नोंदणी केली जात असली तरी एजन्सीच्या कार्यालयासमोरील रांगा काही संपलेल्या नाहीत. नोंदणी केल्यावरही दहा दिवस सिलिंडर येत नाही, असे ग्राहकांचे म्हणणे आहे तर ग्राहकांना तत्काळ सिलिंडर हवे असल्याने ते रांगा लावत आहे, असा एजन्सी मालकांचा दावा आहे.
भारत, हिंदुस्थान, इंडियन या सार्वजनिक पेट्रोलियम कंपन्यांनी नोंदणी (बुकिंग) केल्यावर ४८ तासात सिलिंडर घरपोच मिळायला हवा, असा नियम केला आहे. मात्र, बुकिंग लावल्यानंतर दहा-दहा दिवस सिलिंडर घरी येत नाही. यामुळे गॅस एजन्सीच्या कार्यालयात किंवा गोदामाजवळ ग्राहकांची रोज सकाळी गर्दी होते. अजनी रेल्वे क्वॉटर, रामबाग, जाटतरोडी, इंदिरानगरमधील नागरिक बुधवारी काँग्रेसनगर चौकातील भेंडे गॅस एजन्सीसमोर रांगेत उभे होते. त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर ऑनलाईन बुकिंग आणि सिलिंडरचा वेळेत न होणारा पुरवठा. याचे वास्तव समजून घेत आले.
हिवाळ्याचे दिवसात पाणी गरम करण्यासाठी गॅसचा अधिक वापर होतो. कुटुंबात सहाजण असल्यास १४.२ किलोचे सिलिंडर २० ते २५ दिवसांत संपून जाते.
दोन सिलिंडर असलेतरी बुकिंग केल्यानंतर किती दिवसांनी घरी आणून दिले जाईल, हे निश्चित सांगता येत नसल्याने येथे रांगेत लागून सिलिंडर घेण्यासाठी आलो, असे अजनी रेल्वे वसाहतीमधील युवकाचे म्हणणे होते. रांगेत असलेल्या आणखी एकेला विचारले असता, ते म्हणाले, २० डिसेंबरला सिलिंडर बुकिंग केले.
परंतु सिलिंडर घरपोच मिळाला नाही, अजूनही काही दिवस आले नाही तर अडचण होईल म्हणून एजन्सीत आलो, असे रामबागेत राहणाऱ्या व्यक्तीने म्हणणे होते. अशाप्रकारे अनेकांनी वेळेत घरपोच सिलिंडर मिळत नसल्याचे सांगितले.
४८ तासांत सिलिंडर घरी
मोबाईल फोनवरून सिलिंडर बुकिंग केल्यानंतर ४८ तासांत संबंधित गॅस एजन्सीने ग्राहकाच्या घरी सिलिंडर पोहोचवणे आवश्यक आहे. प्रत्येक २० दिवसानंतर सिलिंडर बुकिंग केले जाऊ शकते. एका ग्राहकाला वर्षभरात १२ अनुदानित सिलिंडर मिळतात.
सिलिंडर पोहोचवण्याचे शुल्क बिलातच
सिलिंडर दारापर्यंत पोहोचवण्याचे शुल्क सिलिंडरच्या किंमतीमध्ये समाविष्ट असते. सिलिंडर पोहोचवणाऱ्याने ते मागायला नको ऑनलाईन बुकिंग होते, परंतु ज्यांच्याकडे एकच सिलिंडर आहे. असे ग्राहक सिलिंडर संपले की, बुकिंग करतात आणि लगेच रिकामे सिलिंडर घेऊन कार्यालयात येतात. गोदाम हिंगण्याला आहे. त्यांची अडचण पाहून त्यांना कार्यालयात सिलिंडर उपलब्ध केले जाते. गरीब लोक सिलिंडरचे पैसे गोळा झाले की, बुकिंग करतात आणि थेट कार्यालयात येतात. मानवतेच्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना परत पाठवत नाही. यामुळे कार्यालयासोर रांग लागलेली दिसते.
– चंद्रशेखर भेंडे, वितरक, भेंडे गॅस एजन्सी, काँग्रेसनगर.