महेश बोकडे, लोकसत्ता
नागपूर : परिवहन खात्याने घरबसल्या शिकाऊ वाहन परवान्याची ऑनलाईन परीक्षा ‘इन कॅमेरा’ घेण्याचा पथदर्शी प्रकल्प मुंबई पूर्व आरटीओत सुरू केला होता. कालांतराने तो राज्यभरात राबवला जाणार होता. परंतु, तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकल्प लांबत होता. अखेर राज्यभरात आता ही परीक्षा घरूनच ‘इन कॅमेरा’ देता येणार आहे. त्यातून भ्रष्टाचाराला आळा बसेल, असा दावा परिवहन खात्याने केला आहे.
‘आरटीओ’तील भ्रष्टाचार संपवण्यासाठी परिवहन खात्याने १४ जून २०२१ पासून घरबसल्या ऑनलाईन परीक्षेतून वाहन परवाने देणे सुरू केले. त्यासाठी राष्ट्रीय माहिती केंद्राकडून (एनआयसी) वाहन व सारथी-४ या संगणकीय प्रणालीत बदल केले. या योजनेतील दोषांवर बोट ठेवत काही असामाजिक तत्त्वांकडून कुणालाही अव्वाच्या सव्वा पैसे आकारून परवाने देणे सुरू केले होते. लोकसत्ताच्या नागपूर कार्यालयातील स्टिंग ऑपरेशनमुळे अंध व्यक्तीही योजनेतील दोषांवर बोट ठेवत हा परवाना मिळत असल्याचा प्रकार पुढे आला होता.
या वृत्ताची दखल घेत तत्कालीन परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये मुंबई पूर्व आरटीओत ही ऑनलाईन परीक्षा ‘इन कॅमेरा’ करण्याचा पथदर्शी प्रकल्प सुरू केला. मात्र, विविध तांत्रिक दोष पुढे येत असल्याने हा प्रकल्प राज्यभरात लांबत असल्याचेही लोकसत्ताने पुढे आणले होते. शेवटी नुकताच हा प्रकल्प राज्यभरात सुरू झाल्याने आता शिकाऊ वाहन परवान्यासाठीची ऑनलाईन परीक्षा ‘इन कॅमेरा’ सुरू झाली आहे.
संशयितांच्या परवान्याची जबाबदारी ‘आरटीओ’कडे
नवीन पद्धतीमध्ये शिकाऊ वाहन परवान्याच्या ‘इन कॅमेरा’ ऑनलाईन परीक्षेत संगणकातील ‘सॉफ्टवेअर’ला काहीही दोष आढळल्यास हा परवाना प्रलंबित गटात वर्ग करून संबंधित आरटीओकडे वर्ग केला जातो. त्यानंतर या आरटीओला संबंधित उमेदवार किती वेळ कॅमेऱ्यापासून दूर होता, त्यावेळी प्रश्न कोणता होता. तो उमेदवाराने चूक सोडवला की बरोबर, चेहऱ्यात काही फरक आढळला काय यासह इतरही माहिती संबंधित आरटीओकडे जाते. त्यानंतर हा आरटीओ संबंधित उमेदवाराला परवाना द्यायचा की नाही, हे निश्चित करतो.
नागपूर ग्रामीणमध्ये १७३ अर्ज नाकारले
बरेच संशयास्पद अर्ज ‘सॉफ्टवेअर’मधून स्वयंचलित पद्धतीने नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयाला वर्ग झाले. त्यापैकी तब्बल १७३ अर्ज नाकारण्यात आले. या उमेदवारांनी ‘इन कॅमेरा’ दिलेली परीक्षा संशयास्पद वाटल्याने हे अर्ज नाकारल्याचे नागपूर ग्रामीणचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी सांगितले.
परिवहन खात्याचा कारभार पारदर्शी करण्यासाठी मुंबई पूर्व ‘आरटीओ’ कार्यालयात सुरू असलेल्या ‘इन कॅमेरा’ शिकाऊ वाहन परवान्याची ऑनलाईन परीक्षेचा प्रकल्प आता राज्यभरात राबवला जात आहे. त्याचा निश्चितच नागरिकांना लाभ होणार आहे.
– विवेक भिमनवार, परिवहन आयुक्त, मुंबई.