चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लिपिक व शिपाई पदासाठीच्या ऑनलाइन परीक्षेतील गोंधळ, परीक्षा रद्द करावी, या मागणीसाठी सुरू असलेले साखळी उपोषण, माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलनाची दखल घेत परीक्षा रद्द करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे दिलेले आश्वासन, यामुळे बँकेची परीक्षा रद्द होते की काय, याकडे परीक्षार्थ्यांचे लक्ष लागले आहे. अशातच सोमवारी परीक्षार्थ्यांच्या ‘आयडी’वर उत्तरपत्रिका आली. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना कमी गुण दिसत असल्याने बँकेच्या संचालक मंडळात अस्वस्थता पसरली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ३५८ लिपिक व शिपाई पदासाठीची परीक्षा २१, २२ व २३ डिसेंबर रोजी झाली. शिपाई पदाच्या ९७ जागांसाठी २१ डिसेंबर रोजी ऑनलाइन परीक्षा सुरू होताच तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर २९ डिसेंबर रोजी परीक्षा घेतली गेली. मात्र नागपुरात रायसोनी परीक्षा केंद्रावर पुन्हा तांत्रिक बिघाड उद्भवला. त्यामुळे आता परीक्षार्थ्यांनीच ही परीक्षा रद्द करावी, अशी मागणी लावून धरली आहे. आरक्षण बचाव कृती समिती व इतर संघटनांनी जिल्हा बँकेसमोर परीक्षा रद्द करावी, या मागणीसाठी साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषण मंडपाला तत्कालीन पालकमंत्री मुनगंटीवार, आमदार जोरगेवार यांनी भेट देत परीक्षा रद्द करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

हेही वाचा…आधी गळा आवळला, मग रस्त्यावर डोके आपटले; ‘मॉर्निंग वॉक’साठी गेलेल्या महिलेची हत्या

‘त्या’ आश्वासनाचे काय?

परीक्षार्थ्यांच्या ‘आयडी’वर त्यांच्या ऑनलाइन परीक्षेच्या उत्तरपत्रिका आल्या आहेत. असंख्य विद्यार्थ्यांना यात कमी गुण मिळाल्याचे दिसते. यामुळे बँकेच्या संचालक मंडळात अस्वस्थतेचे वातावरण आहे. कारण, संचालक मंडळाने अनेकांना नोकरीचे आश्वासन दिले होते, अशी माहिती समोर येत आहे. आता ऑनलाइन उत्तरपत्रिका पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

निकालाबाबत अनभिज्ञ

परीक्षार्थ्यांना आता निकालाची प्रतीक्षा आहे. मात्र, परीक्षेचा निकाल कधी लागणार, याबाबत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी देखील अनभिज्ञ आहेत. बँकेचे अध्यक्ष संतोष रावत परीक्षेसंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी मुंबईला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा…“तुमच्या घरातून चोरी झालेले दागिने सापडले…” पोलिसांनी ३ कोटींचा मुद्देमाल…

एका जागेसाठी ४० लाख रुपये!

नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरतीचा प्रश्न आमदार किशोर जोरगेवार आणि आमदार देवराव भोंगळे यांनी उपस्थित केला होता. ऑनलाइन परीक्षा एक फार्स असल्याचा आरोप त्यांचा होता. जोरगेवार यांनी नोकरभरतीत एका जागेसाठी ४० लाख रुपये एका उमेदवाराकडून घेतल्या गेले, असा गंभीर आरोप केला होता. आता या आरोपांच्या चौकशीची मागणीदेखील परीक्षार्थ्यांनी केली आहे. मागील तीन वर्षांपासून नोकरभरतीची ही प्रक्रिया सुरू आहे. मात्र, कोणत्या ना कोणत्या वादामुळे परीक्षेत अडथळा येत आहे. आता देखील ही परीक्षा रद्द करावी, अशी मागणी परीक्षार्थी करीत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Online exam for post of clerk and constable of cooperative bank on december 21 canceled due to technical glitches rsj 74 sud 02