नागपूर : प्रत्येक धर्मिय नित्याने त्यांच्या धार्मिक स्थळी दर्शनाला जात असतात. हिंदु भाविकही मोठ्या संख्येने नियमित शेगाव आणि त्रंबकेश्वरला गजानन महाराजाच्या दर्शनासाठी जात असतात. इतरही हिंदूच्या धार्मिक स्थळावर स्थिती सारखीच असते. या भाविकांची संख्या बघता त्यांना ऑनलाईन पद्धतीने लुटण्याची नवीन क्लृप्ती समाजकंटकांनी शोधून काढली आहे. त्यानुसार पूणे येथील निरंजन वेलणकरसह इतरही काहींची फसवणूक झाली आहे. या क्लृप्तीबाबत आपण जाणून घेऊ या.
शेगावचे मंदीर अथवा त्र्यंबकेश्वरच्या गजानन महाराजांच्या मठात रोज देशाच्या वेगवेगळ्या भागातून हजारो भाविक जात असतात. या भाविकांसाठी संस्थानातर्फे मोठ्या प्रमाणात भक्त निवास उभारण्यात आले आहे. येथे माफक दरात भाविकांना थांबण्याची उत्तम व्यवस्था असते. तर माफक दरात भोजनसह इतरही सोय केली जाते. त्र्यंबकेश्वर मध्ये गजानन महाराजांच्या मठातील धार्मिक स्थळ परिसरातही ही सोय आहे. देशातील विविध धार्मिक स्थळाला जाणाऱ्या भाविकांची संख्या बघता त्यांना लुटण्याची नवीन क्लृप्ती समाजकंटकांनी अंमलात आणली आहे. राज्यातील काही भाविकांची यापद्धतीने फसवणूक झाल्याचा प्रकार समर्थ सद्गुरू गजानन महाराज उपासना केंद्राचे जयंत वेलणकर यांनी पुढे आणला आहे.

वेलणकर यांचा पुतण्या निरंजन पुणे येथे राहतो. त्याला त्र्यंबकेश्वरमधील गजानन महाराजांच्या मठात दर्शनासाठी जायचे होते. त्यामुळे त्याने संकेतस्थळाद्वारे तेथील निवाऱ्याची नोंदणीसाठी प्रयत्न केले. त्याला ‘गजानन महाराज संस्थान त्र्यंबक’ अशी वेबसाईट आढळली. त्यावर त्याने शेगावच्या निवाऱ्याच्या उद्देशाने ५ हजार रुपये भरले. त्यानंतर त्याला ही फसवे संकेतस्थळ असल्याचे लक्षात येऊन त्याची फसवणूक झाल्याचे निदर्शनात आले. तर ब्रम्हपुरीचे गोपाळ भट्टड यांना त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी जायचे होते. त्यांनीही संकेतस्थळाद्वारे निवाऱ्याची नोंदणीचा प्रयत्न केला. त्यासाठी साडेतीन हजाराच्या जवळपास पैसेभरले. परंतु त्यांना शंका आल्याने त्यांनी लगेच बँकेशी संपर्क साधत हे पैसे थांबवण्याची सूचना केली. त्यामुळे त्यांची फसवणूक थोडक्यात टळली. परंतु या पद्धतीने नागपूरसह जगभरातील लक्षावधी भाविकांची फसवणूक होत असून या समाजकंटकांविरूद्ध जनजागृतीची गरज असल्याचे मत जयंत वेलणकर यांनी व्यक्त केले.

शेगावला अधिकृत एकच संकेतस्थळ आहे- वेलणकर

पुतण्याची फसवणूक जाल्यावर मी नेहमीप्रमाने शेगाव संस्थानात दर्शनाला गेल्यावर काही पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी या पद्धतीने फसवणूकीचे प्रकरण पुढे येतात. परंतु आम्ही काळजी घेतो. भक्तांनीही काळजी घ्यावी, असे सांगितले. परंतु या संस्थानाची सध्या http://www.gajananmaharaj.org हे एकच अधिकृत संकेतस्थळ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. येथे ऑनलाईन नोंदणी होत नाही. त्यामुळे भाविकांनी इतर संकेतस्थळावर आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहनही वेलणकर यांनी केले. तर अयोध्यासह इतरही धार्मिक स्थळावर हा प्रकार होत असल्याचेही, जयंत वेलणकर यांनी सांगितले.