लोकसत्ता टीम
अमरावती: नोकरीच्या शोधात असलेल्या येथील एका व्यक्तीला ‘मुव्ही रेटिंग’ व्यवसायात गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे आश्वासन देऊन सायबर गुन्हेगारांनी २.६० लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. तक्रारदाराला सुरुवातीला उच्च परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले आणि नंतर त्यांना पैसे देण्यास भाग पाडण्यात आले.
या प्रकरणी राठीनगर येथील रहिवासी असलेल्या सौरभ लक्ष्मण वानखडे यांच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ५ ते १४ मे या कालावधीत ही फसवणूकीची घटना घडली. सौरभ वानखडे हे गुगलवर नोकरीच्या संधी शोधत होते. हे करीत असताना त्यांच्या व्हॉट्सअप मोबाईल क्रमांकावर एक लिंक पाठविण्यात आली. त्या लिंकवर क्लिक करताच त्यांना नोकरीविषयक माहिती भरण्यास सांगितले. त्यांनी ती भरून पाठविल्यानंतर त्यांना पलीकडून नोकरी उपलब्ध नाही, असे उत्तर देण्यात आले. त्याच लिंकमध्ये इंटरटेनमेंट हा एक पर्याय देण्यात आला होता. सौरभ यांनी तो निवडला. त्यानंतर त्यांना बालाजी टेलिफिल्म ऑनलाईन रेटिंगची आणि संपूर्ण टास्कची माहिती देण्यात आली.
आणखी वाचा- नागपूर: बिल्डरची १.८० कोटींनी फसवणूक
सौरभ यांना पुन्हा एक लिंक पाठविण्यात आली. त्यात बँक खात्याची माहिती सादर करण्यास सांगण्यात आले. सौरभ यांना मुव्ही रेटिंग, सीरीज रेटिंग, टास्क खेळण्यास सांगून चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले. सौरभ यांना टास्क खेळण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर वेगवेगळ्या खात्यांवर पैसे भरण्यास सांगण्यात आले. त्यांनी एकूण २ लाख ५९ हजार रुपये या खात्यांमध्ये जमा केले, पण त्यांना परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सौरभ यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.