यवतमाळ : महिलेला व्हॉट्सअॅपवर यू ट्यूब व्हिडीओची लिंक आली. त्यासोबतच मॅसेज आला की, व्हिडीओ सबस्क्राईब आणि शेअर केल्यास त्यासाठी पैसे देण्यात येतील. अशाप्रकारे महिलेची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. त्या महिलेने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार करताच पोलिसांनी तात्काळ दखल घेतली. महिलेसह अन्य एका दुसर्या प्रकरणात असे एकूण एक लाख ७५ हजार रुपये ‘होल्ड’ करण्यात आले.
अवधूतवाडी येथे राहणार्या महिलेला १९ एप्रिलरोजी व्हॉट्सअॅपवर मॅसेज आला. त्यात यू ट्यूब चॅनल सबस्क्राईब आणि शेअर केल्यास पैसे देण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यानुसार महिलेने व्हिडीओ शेअर करून दोन हजार रुपये पाठविले. त्यानंतर दोन हजार ८०० रुपये परत आले. खात्री झाल्याने तक्रारदार महिलेने पाच हजार, ३० हजार, ९० हजार असे एकूण एक लाख २५ हजार रुपये मोबाइल क्रमांकावर ऑनलाइन पेमेंट केले. त्यानंतर त्यांना एकही रुपया परत न आल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी स्टेटमेंटचा अभ्यास केला व नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदविल्याने एक लाख २५ हजार रुपये होल्ड करण्यात यश आले.
हेही वाचा – ‘ई-वेस्ट’ द्या, पैसे घ्या! पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद
दुसर्या एका प्रकरणात २१ एप्रिल रोजी विनित पुनसे यांना व्हॉट्सअॅपवर पार्टटाईम जॉब करण्याचा मॅसेज आला. तक्रारदाराने त्यासाठी तयारी दर्शविली. त्यांना टेलिग्राम ग्रुपमध्ये अॅड करून वेगवेगळे टास्क करायला लावले. त्यासाठी दोनवेळा पैसेही मिळाले. त्यानंतर तक्रारदाराने १५ हजार, ५० हजार, ५० हजार रुपये त्यांना आलेल्या लिंकवर पाठविले. मात्र, पैसे परत न मिळाल्याने फसवणुकीचा प्रकार लक्षात आला. त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणात ५० हजार रुपये होल्ड करण्यात आले. अशाप्रकारे दोन ऑनलाइन फसवणुकीतील एक लाख ७५ हजार रुपये होल्ड करण्यात यश आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मनीष दिवटे, सहायक पोलीस निरीक्षक विकास मुंढे, अजय निबोंळकर, अभिनव बोंद्रे, प्रणय इटकर आदींनी केली.