लोकसत्ता टीम
नागपूर: ‘ऑनलाईन गेम’च्या तीन पत्ती, रमी आणि कसीनो अशा गेममध्ये पैसे लावल्यास दिवसाला लाखोंचा फायदा करून देण्याचे आमिष दाखवून गोंदियातील एका आरोपीने व्यापारी मित्राची ५८ कोटी रुपयांनी ‘हायटेक’ फसवणूक केली. आरोपीने बनावट लिंक पाठवून स्वत:च रक्कम हडपल्याची धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी आरोपीच्या घरात छापा घालून १५ किलो सोने, २०० किलो चांदी आणि १८ कोटींची रक्कम जप्त केली,अशी माहिती समोर आली आहे. अनंत उर्फ सोन्टू नवरतन जैन (रा. गोंदिया) असे आरोपीचे नाव आहे,
आरोपी अनंत जैन हा सट्टेबाज असून त्याचा कापडाचा व्यवसाय आहे. त्याची नागपुरातील पीडित व्यापारी यांच्याशी मैत्री होती. त्यामुळे दोघांचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. कौटुंबिक नाते असल्यामुळे अनंत जैनवर विश्वास होता. मात्र, तेथेच घात झाला. अनंत जैनची नजर व्यापाऱ्याच्या कमावाईवर फिरली. त्याने मित्रालाच फसविण्याची योजना आखली. मित्राला ऑनलाईन गेमींग अॅपवर पैसे लावल्यास झटपट लाखोंचा नफा करून देण्याचे आमिष दाखवले. मित्राच्या बोलण्यावर त्यांनी विश्वास ठेवला. अनंत जैनने सायबरचे ज्ञान असलेली टोळी तयार केली. त्यांनी स्वतःचे ऑनलाईन गेमींगचे अॅप बनवले. त्यांच्या अॅपवर पैसे लावणाऱ्यांना जैन हा बनावट लिंक पाठवत होता. अशा बनावट लिंकवर पीडित व्यापाऱ्याने जवळपास ६३ कोटी रुपये लावले. हे सर्व पैसे जैनने उकळून मित्राचीच फसवणूक केली.
आणखी वाचा-नागपूर: भावाच्या डोळ्यासमोरच बहिणीचा मृत्यू
अशी केली फसवणूक
२०२१ मध्ये पीडित व्यापाऱ्याने ५ लाख रुपये गेममध्ये लावले. त्याला लगेच काही तासांतच ८ लाख रुपये मिळाले. जैन याने मित्राला जास्त रक्कम लावण्यास प्रोत्साहित केले. जैन हा बनावट लिंक मित्राला पाठवत होता. कमी रक्कम लावल्यास जिंकल्याचे भासवून जास्त पैसे परत करीत होता. तर मोठी रक्कम लावल्यास हमखास हरवून पैसे उकळत होता. ५ ते १० लाख रुपये लावल्यास लगेच १५ ते १८ लाख रुपये मिळत होते. तर १ कोटींची रक्कम लावल्यास ऑनलाईम गेममध्ये हरवून पैसे उकळल्या जात होते.
गोंदियात पोलिसांचा छापा
व्यापाऱ्याचे तब्बल ५८ कोटी रुपये गेल्यानंतर अनंत जैन हा बनावट लिंक पाठवून हरवित होता, असे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पैसे परत मागितले. मात्र, जैनने जीवे मारण्याची धमकी देऊन ४० लाखांची खंडणी मागितली. घाबरलेल्या व्यापाऱ्याने सायबर सेलमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी गोंदियात जैनच्या घरी छापा घातला. घरातून १५ किलो सोने आणि १८ कोटी रुपये जप्त केले. अनंत जैन फरार असून तो दुबईला पळून गेल्याची माहिती समोर आली आहे.