अकोला : पणन हंगाम २०२३-२४ मध्ये किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत भरडधान्याचे उद्दिष्ट विभागून देण्यात आले आहे. राज्यात आता पणन महासंघासह आदिवासी विकास महामंडळ देखील हमीभावावर ज्वारी खरेदी करणार आहे. यासंदर्भात पुरवठा विभागाने आदेश काढले आहेत. ३० जूनपर्यंत ज्वारीची खरेदी केली जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्र शासनाने राज्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत पणन हंगाम २०२३-२४ मध्ये मका, ज्वारी व रागी हे भरडधान्य खरेदीच्या उद्दिष्टाला मंजुरी दिली आहे. केंद्र शासनाने नेमून दिलेले ज्वारी व रागी खरेदीचे उद्दिष्ट म.रा. सहकारी पणन महासंघ मर्या.मुंबई व म.रा.सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या. नाशिक या संस्थांना विभागून दिले आहे. १३ हजार ६०० मे.टन ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट पणन महासंघासाठी असून दोन हजार मे.टन खरेदी आदिवासी विकास महामंडळाला करावी लागेल. १०० मे.टन रागी पणन महासंघ खरेदी करणार आहे. ८ मेपासून हमीभावाने खरेदी सुरू करण्यात आली असून ३० जूनपर्यंत ती सुरू राहणार आहे. दोन्ही संस्थांचे जिल्हानिहाय उद्दिष्ट निश्चित केले आहे. किमान आधारभूत योजनेचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे धान्य खरेदीसाठी नियोजन व उपाययोजना करण्याच्या सूचना पुरवठा विभागाने दोन्ही संस्थांच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिल्या आहेत.

हेही वाचा…बुलढाणा: भरधाव दुचाकी बसला धडकली, युवक ठार, एक गंभीर

‘ऑफलाइन’नव्हे केवळ ‘ऑनलाइन’

पणन महासंघ व आदिवासी विकास महामंडळाद्वारे ज्वारीची केवळ ऑनलाइन पोर्टलद्वारेच खरेदी केली जाणार आहे. ऑफलाइन खरेदी होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी ३१ मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मुदतीमध्ये केंद्र शासनाने ठरवलेल्या दर्जानुसार खरेदी केली जाईल.

हेही वाचा…फुकट्या प्रवाशांना मोठा दणका…..रेल्वेच्या व्युहरचनेमुळे……

बाजारात दर कमी

हायब्रीड ज्वारीला २०२२-२३ मध्ये दोन हजार ९७० रुपये हमीभाव होता. यंदा तो तीन हजार १८० रुपये करण्यात आला आहे. ज्वारी मालदांडीला दोन हजार ९९० रुपयांवरून यावर्षी तीन हजार २२५ रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला. बाजार समितीमध्ये ज्वारीला सरासरी एक हजार ८५० ते दोन हजार ३७० पर्यंत दर प्राप्त होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Online procurement of sorghum in maharashtra under minimum base price scheme ppd 88 psg