लोकसत्ता टीम
गोंदिया : स्नॅप डिल अपवरून पाचशेचे कापड ऑनलाइन मागविले. ते पसंद न पडल्याने परत करण्यासाठी कस्टमर केअरशी संपर्क केला. हीच संधी साधून अज्ञात आरोपीने त्यांच्या, त्यांची आई आणि बहिणीच्या खात्यातून १ लाख १८ हजार ४९५ रुपये आपल्या खात्यात वळविले. ही घटना शहरातील संतोष नरेंद्रसिंग प्रमर (वय ६२, रा. रेलटोली) गोंदिया यांच्यासोबत घडली.
गोंदिया शहरातील रेलटोली परिसरातील संतोष नरेंद्रसिंग प्रमर यांनी २५ डिसेंबर २०२३ रोजी स्नॅप डिल अपद्वारे पाचशे रुपये किंमतीचे कपडे मागविले. ते कपडे घरी पोहोचले असता त्यांना आवडले नाही. त्यामुळे खरेदी केलेले कपडे परत करण्यासाठी २७ डिसेंबरला त्यांनी आपल्या मोबाइलवरून गुगलवर इंटरनेटद्वारे स्नॅप डिल कंपनीचा कस्टमर केअर क्रमांक शोधला. त्या क्रमांकावर संपर्क केला, मात्र बोलणे झाले नाही. २८ डिसेंबरला त्यांना सकाळी एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. समोरच्या व्यक्तीने कस्टमर केअरवरून बोलत असून आपली तक्रार आमच्याकडे आली आहे.
आणखी वाचा- काँग्रेसच्या जाहिरातीत वरिष्ठ नेत्यांना डच्चू; शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांना मात्र मानाचे स्थान!
आम्हाला कपडे पसंद नाही, त्यामुळे तुमचे पैसे आम्ही परत करणार आहोत, असे सांगून एक रिमोट आयडी दिली. त्या आयडीच्या साहाय्याने अज्ञात आरोपीने संतोष प्रमर यांच्या आईच्या बँक ऑफ बडोदा बँक खात्यातून ७२ हजार ९९८ रुपये, भारतीय स्टेट बँकेच्या खात्यातून २० हजार ५०१ रुपये आणि त्यांच्या बहिणीच्या स्टेट बँकेच्या खात्यातून २४ हजार ९९६ रुपये असे एकूण १ लाख १८ हजार ४९५ रुपये आपल्या खात्यात वळते केले. आपली फसवणूक झाल्यानंतर संतोष प्रमर यांनी १७ जानेवारीला रामनगर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास रामनगर चे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे करीत आहे.